पुणे प्रतिनिधी
पुणे, दि. २५ : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी सतर्क राहायला हवे. विशेषतः पत्रकारांनी 2024 पर्यंत आपल्या विरोधात एकही बातमी छापू नये, यासाठी त्यांना चहा प्यायला घेऊन जा, त्यांना चहा प्यायला बोलवायचे, म्हणजे समजलेच असेल तुम्हाला, असे सांगत त्यांना ढाब्यावरही घेऊन जा, असा सल्ला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत दिला.संबंधित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे नाशिक दौऱ्यावर असून त्यांनी अहमदनगर जिल्ह्यातील भाजप पदाधिकाऱ्यांची संवाद साधला. यावेळी बुथरचना आणि पदाधिकाऱ्यांनी सांभाळायच्या जबाबदाऱ्या या विषयावर बावनकुळे यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले आहे. याच बैठकीत त्यांनी पत्रकारांना चहा प्यायला घेऊन जा, अशा प्रकारचे वक्तव्य केले आहे. याबाबतची ऑडिओ क्लिप समोर आली असून, माध्यमांना बैठकीला परवानगी नसल्याने व्हिडीओ उपलब्ध होऊ शकला नाही, मात्र या ऑडिओ क्लिपमुळे पत्रकारांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
ऑडिओ क्लिपमध्ये ऐकायला मिळते की, ‘ज्या बुथवर तुम्ही काम कराल, तेथे इलेक्ट्रॉनिक मीडियावाले कोण आहेत, पोर्टल वाले कोण आहेत, प्रिंट मीडियावाले कोण आहेत हे पाहावे. आपण एवढे चांगले काम करतो, पण हे असे काही टाकतात की, जणू गावात बॉम्बच फुटलाय. यासाठी बुथवर जे चार, पाच पत्रकार आहेत, त्यांची यादी तयार करा, आपल्या बुथवर निगेटिव्हिटी होऊ द्यायची नाही, आपल्याविरुद्ध लिहू नये, विरोधात काही येणार नाही, याची काळजी घ्या, यात एक-दोन पोर्टल वाले, प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक वाले असतील, त्यांना महिन्यातून एकदा चहा प्यायला बोलवा, चहा प्यायला बोलवायचे, म्हणजे तुम्हाला काय करायचे आहे, हे समजले असेल, त्यात काही कमी जास्त झाले तर सुजय विखे आहेतच. मिशन महाविजय 2024 पर्यंत बुथ संदर्भात एकही बातमी विरोधात येणार नाही, याची काळजी घ्या, सर्व सकारात्मक आल्या पाहिजेत याची काळजी घ्या.’












