पुणे | प्रतिनिधी
पुणे दि.०२ : सतत सुरू असलेल्या पावसामुळे पिंपरी-चिंचवड शहरासाठी पाण्याचा मुख्य स्त्रोत असलेले पवना धरण त्याच्या क्षमतेच्या १००% भरले असून प्राधिकरणाने आज सकाळपासून वीज निर्मिती प्रकल्पातून नदीत पाणी सोडण्यास सुरुवात केली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार दुपारी १२ पासून धरणातून १ हजार ४०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात येणार आहे.
आज पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे विसर्ग आणखी वाढण्याची शक्यता असल्याने पवना नदीच्या आजूबाजूला राहणाऱ्या नागरिकांना नदीपात्रात न येण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, जनावरे व इतर मौल्यवान वस्तूंचे स्थलांतर करावे, अश्या सूचना अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. पाटबंधारे विभागानेही नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेण्याच्या आवाहन केले आहे.
दरम्यान, कासारसाई धरणातूनही आज सकाळपासून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आल्याची माहिती पाटबंधारे विभागाने दिली आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, कासारसाई नाल्यात ४०० क्युसेक पाणी सोडले जात असून पाणलोट क्षेत्रातील पावसाच्या आधारे विसर्ग आणखी वाढविण्याचा निर्णय घेतला जाईल.












