पुणे : दरवर्षी पावसाची कृपादृष्टी असणारा पश्चिम महाराष्ट्र यंदा टँकरग्रस्त झाला आहे. पुणे विभागातील कोल्हापूर जिल्हा वगळता पुणे, सातारा, सांगली आणि सोलापूर या चार जिल्ह्यांत मिळून ३३४ गावांतील तब्बल सहा लाख ७२ हजार ८०७ नागरिकांना ३६४ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. सर्वाधिक झळ सातारा आणि पुणे जिल्ह्यांना बसत आहे. उन्हाळ्यात सुरू झालेले टँकर अद्यापही सुरूच असून टँकरच्या संख्येत आगामी काळात मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता विभागीय आयुक्तालयाकडून व्यक्त करण्यात आली आहे.
सर्वार्थाने सधन अशी ओळख असलेल्या पश्चिम महाराष्ट्रात गेल्या वर्षी पावसाने ओढ दिली. उन्हाच्या झळांमुळे काही ठिकाणी पिके वाळत असल्याचे चित्र आहे. सिंचनाची सोय असलेल्या भागात अद्याप पिकांनी मान टाकलेली नाही. चारा उपलब्धतेवर देखील परिणाम झाला असून कोल्हापूरवगळता इतर चारही जिल्ह्यांत विहिरींनी तळ गाठला आहे. पाऊस कमी झालेल्या तालुक्यांत जनावरांच्या चाऱ्या-पाण्याची टंचाई जाणवत आहे. पुणे जिल्ह्यात आंबेगाव, बारामती, दौंड, हवेली, इंदापूर, जुन्नर आणि पुरंदर तालुक्यांत भीषण स्थिती आहे. साताऱ्यात माण, खटाव, कोरेगाव, खंडाळा, फलटण आणि काही प्रमाणात वाई, पाटण तालुक्यांतील गावांना फटका बसला आहे. सांगलीतील जत आणि आटपाडी, तर सोलापूर जिल्ह्यात सांगोला, मंगळवेढा, माढा, करमाळा, दक्षिण सोलापूर आणि माळशिरस तालुक्यांमध्ये भीषण परिस्थिती ओढवली आहे.
पुणे जिल्ह्यात २२ विहिरी ताब्यात घेण्यात आल्या आहेत. साताऱ्यात ९३, सांगलीत ४१, तर सोलापूर जिल्ह्यात २४ विहिरी पाणीपुरवठ्यासाठी ताब्यात घेण्यात आल्या आहेत, असेही विभागीय आयुक्तालयाकडून सांगण्यात आले.