पुणे प्रतिनिधी
नवी दिल्ली : देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका यावर्षी होणार आहेत. यासंदर्भातील निवडणुकांच्या तारखा निवडणूक आयोग आज जाहीर करणार आहे. आज दुपारी १२ वाजता पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोग तारखांची घोषणा करेल. तेलंगणा, छत्तीसगड, राजस्थान, मध्य प्रदेश आणि मिझोराम या पाच राज्यात विधानसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत.
लोकसभेच्या आधी पाच राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे या निवडणुकांना महत्व आले आहे. या निवडणुकांच्या निकालावरुन देशातील जनतेचा कौल कुणाकडे आहे, याबाबत काही स्पष्टता मिळू शकणार आहे. भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि विरोधी पक्षांनी निवडणुकांची जोरदार तयारी सुरु केली आहे. ( The Election Commission of India will announce poll dates for five states press conference will begin at 12pm )
भारतीय जनता पक्षाचे सरकार मध्य प्रदेशात आहे. तर, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये कॉंग्रेसचे सरकार आहे. मिझोरममध्ये मिजो नॅशनल फ्रंट आणि तेलंगाणात भारत राष्ट्र समिती म्हणजे बीआरएस सत्तेत आहे. पाच राज्यातील विधानसभेच्या निवडणुका या लोकसभा निवडणुकीच्या आधी होणाऱ्या सेमीफायनल म्हणून ओळखल्या जात आहेत.
मध्य प्रदेशात २३० विधानसभेच्या जागा असून येथे भाजप आणि काँग्रेस अशी थेट लढत होईल. प्रदेशात समाजवादी पार्टी आणि आप हेदेखील निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची शक्यता आहे. राजस्थानमधील जनता प्रत्येकवेळी सरकार बदलत असते. त्यामुळे यावेळीही असं होतं का हे पाहावं लागेल. राजस्थानमध्ये विधानसभेच्या २०० जागा आहेत.
तेलंगणात एकूण ११९ जागा आहेत. याठिकाणी के चंद्रशेखर राव यांचा पक्ष, भाजप आणि काँग्रेस यांच्यामध्ये लढत होईल. छत्तीसगडमध्ये विधानसभेच्या ९० जागा आहेत. भाजप याठिकाणी सत्तेमध्ये येण्यास प्रयत्न करत आहे.












