गेल्या वर्षी मोसमी पावसाने आखडता हात घेतला. त्यामुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा जमा झाला नाही. हीच परिस्थिती जिल्ह्यातील अन्य धरण प्रकल्पांची असल्याने अनेक तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला. पाणी कमी असल्याने पिकांना फटका बसत आहे. या पार्श्वभूमीवर धरणांमधील उपलब्ध पाण्याचे वितरण आणि शेतीसाठी पाणी देण्याबाबत उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कालवा सल्लागार समितीची बैठक झाली.
त्यामध्ये धरणातील पाणी वापराचे नियोजन करण्यात आले. त्यानुसार उन्हाळी आवर्तनाचा पहिला टप्पा मार्चच्या पहिल्या आठवड्यात सुरू करण्यात आला आहे. ४ मार्चपासून शेतीसाठी चार टीएमसी पाणी सोडण्यात आले. १७ दिवसांचा कालावधी उलटल्यानंतर इंदापूर तालुक्यापर्यंत पाणी पोहचताना अनेक अडचणी आल्याचे समोर आले आहे. त्यामुळे जलसंपदा विभागाने आता कारवाईचा बडगा उचलला आहे. कालव्यातून येत असलेले पाणी कमी असून, गढूळ असल्याच्या तक्रारी स्थानिक शेतकऱ्यांनी जलसंपदा विभागाकडे केल्या. त्यानंतर खडकवासला पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता श्वेता कुऱ्हाडे यांनी तातडीने कालव्याची पाहणी केली. दौंड, पाटस, उरुळी, हडपसर, सिंहगड रस्ता या भागातून जाणाऱ्या मुठा कालव्यातून पाण्याचा प्रवाह आहे. मात्र, हडपसरपुढील भागामध्ये काही शेतकऱ्यांनी पंप, मोटर, पाइप टाकल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे पाणीचोरी होत असल्याचे दिसून आले. तसेच शहरातील हडपसर भागातून वाहणाऱ्या कालव्यात मोठ्या प्रमाणात प्लास्टिकच्या पिशव्या, कचरा टाकल्याचे आढळून आले आहे. या पार्श्वभूमीवर जलसंपदा विभागाकडून पाणी चोरीसंदर्भात तातडीने विभागनिहाय कारवाई करण्यात आली आहे. प्रदूषणाबाबत महानगरपालिकेला संबंधितांवर कारवाई करण्याची नोटीस पाठविण्यात आली आहे, असे कुऱ्हाडे यांनी सांगितले.