पिंपरी- सांडपाणी व मलनिस्सारण (ड्रेनेज) वाहिनीमध्ये पुरुष जातीचे सहा महिन्यांचे मृत अर्भक आढळून आले. हा प्रकार पिंपरी रेल्वे स्टेशन परिसरातील गुरुदत्त नगर येथील नाणेकर चाळीत सकाळी साडेअकराच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला.
याबाबत पोलीस शिपाई गणेश सुरेश परदेशी (वय-४०) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. यावरुन भा.दं.वी. कलम ३१५ नुसार एका अज्ञात महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुदत्त नगरमधील सांडपाणी व मलनिस्सारण वाहिनी तुंबल्याने घाण पाणी रस्त्यावर येत होते. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी याबाबत महापालिकेच्या आरोग्य विभागाला माहिती दिली.
त्यानुसार आरोग्य विभागाचे कर्मचारी मलनिस्सारण वाहिनीमधील कचरा बाहेर काढत असताना त्यांना मृत अर्भक आढळले. सुरुवातीला बाहुली असल्यासारखे कर्मचाऱ्यांना वाटले. मात्र, ते मृत अर्भक असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अर्भक ताब्यात घेतले. त्या अर्भकाचे पालिकेच्या वायसीएम रुग्णालयामध्ये शवविच्छेदन करण्यात आले.
मलनिस्सारण वाहिनीमध्ये आढळलेले हे अर्भक पाच ते सहा महिने वयाचे पुरुष जातीचे आहे. त्याला जन्म देण्याची इच्छा नसल्याने त्याचा मृत्यू घडवून आणण्याच्या उद्देशाने ड्रेनेजमध्ये टाकून देण्यात आले, असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
याप्रकरणी गुन्हा दाखल करुन पिंपरी पोलीस संबंधित महिलेचा शोध घेत आहेत. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक संदीप देशमुख करीत आहेत.