पिंपरी : सहज चापट मारल्याचा राग आल्याने तरुणाच्या छातीवर हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यामध्ये तरुणाचा मृत्यू झाला. हा प्रकार मंगळवारी (दि.२१) दुपारी एकच्या सुमारास लिंक रोड चिंचवड येथे घडला आहे. याप्रकरणी चिंचवड पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल करुन एकाला अटक केली आहे.
राजकुमार कसबे (वय २८) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत दिलीप नामदेव कसबे (वय-५५ रा. पत्राशेट झोपडपट्टी, चिंचवड) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन मिथुन उर्फ भारत मधुकर सिरसाट (वय-३८), अतिश भारत सिरसाट (दोघे रा. पत्राशेड झोपडपट्टी, चिंचवड) यांच्यावर भा.दं.वि. कलम ३०४(२), ३४ नुसार गुन्हा दाखल करुन भारत सिरसाट याला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी यांचा मुलगा व आरोपी लिंक रोड वरील जलशुद्धीकरण केंद्राच्या समोर थांबले होते. फिर्यादी यांच्या मुलाने आरोपी भारत याच्याकडे सिगारेट पिण्यासाठी मागितली. त्यावेळी आरोपीने सिगारेट देण्यास नकार दिला म्हणून फिर्यादी यांच्या मुलाने भारतच्या डोक्यात एक सहज चापट मारली. याचा राग आल्याने भारत आणि अतिश यांनी फिर्यादी यांच्या मुलाच्या छातीवर हाताने व लाथाबुक्क्यांनी जोरात मारले. मारहाणीत त्याचा मृत्यू होईल असे माहित असताना देखील आरोपींनी त्याला मारहाण केली. यामध्ये फिर्यादी यांचा मुलगा राजकुमार याचा मृत्यू झाला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक व्हरकाटे करीत आहेत.