पुणे । प्रतिनिधी
पुणे दि. २८ : पिंपरी चिंचवडमध्ये काँग्रेसमधील गटबाजी आणि नाराजी चव्हाट्यावर आली आहे. ‘एक व्यक्ती, एक पद’ हा नियम का लागू केला जात नाही, असा सवाल करत जुन्या पदाधिकाऱ्यांनी थेट प्रदेशाध्यक्षांना पत्र पाठवून शहराध्यक्ष कैलास कदम यांच्या दोन पदांबाबत आक्षेप घेतला आहे. कदम यांच्याकडे काँग्रेस शहराध्यक्ष पदाबरोबरच इंटकचे प्रदेशाध्यक्षपद आहे.
रामकृष्ण मोरे यांच्या निधनानंतर शहरात काँग्रेसला उतरती कळा लागली. राज्यात सत्ता असताना शहरातील पदाधिकाऱ्यांना ताकत मिळाली नाही. त्यामुळे अनेकांनी हातावर राष्ट्रवादीचे घड्याळ बांधणे पसंत केले. सन २०१७ च्या महापालिका निवडणुकीत काँग्रेसने ६६ उमेदवार उभे केले होते. मात्र काँग्रेसला भोपळा मिळाला. काँग्रेसचा एकही नगरसेवक मागील सभागृहात नव्हता. शहर काँग्रेसमुक्त झाले होते. मावळ लोकसभेसह विधानसभेला तीनही मतदारसंघांत काँग्रेसचा उमेदवार नव्हता. मात्र आगामी निवडणुकीसाठी शहरातील काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.












