पिंपरी – चिंचवड: चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये दहशत पसरविणाऱ्या आदर्श उर्फ सोन्या विठ्ठल लुडेकर याला तडीपार करण्यात आले आहे. सोन्या हा चिखली परिसरात व्यावसायिकांसह इतरांना धमकवत गुंडगिरी, दादागिरी करायचा. त्याच्या दहशतीमुळे अनेक नागरिक त्रस्त झाले होते, मात्र पुढे येऊन पोलिसात तक्रार देत नव्हते. अखेर त्याला चिखली पोलिसांनी दोन वर्षांकरिता तडीपार केले आहे. चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीत दादागिरी आणि गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही. असा इशारा वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर यांनी दिला आहे.
पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी पिंपरी-चिंचवड शहरातील गुन्हेगारी कमी करण्याच्या उद्देशाने अनेक पावले उचललेली आहेत. त्यांचा चौबे पॅटर्न शहरात चंजलाच जगला आहे व त्याचे परिणाम देखील गाव गुंड्यांवर पाहायला मिळत आहे. लोकसभा निवडणुकीत काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून शहरातील सराईत गुन्हेगारांचा बंदोबस्त केला जात आहे. चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीत आदर्श उर्फ सोन्या विठ्ठल लुडेकर या सराईत गुन्हेगाराला चिखली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर यांनी तडीपारचा प्रस्ताव तयार करून तो पोलीस उपायुक्त शिवाजी पवार यांनी पारित करून दोन वर्षांकरिता दहशत पसरविणाऱ्या आदर्श उर्फ सोन्या विठ्ठल लुडेकर याला पिंपरी- चिंचवड, पुणे पोलीस आयुक्तालय तसेच पुणे ग्रामीण हद्दीतून दोन वर्षांकरिता तडीपार करण्यात आले आहे.
गुन्हेगार सोन्याची स्वतःची गँग आहे. तो त्याद्वारे गुंडगिरी आणि दादागिरी करायचा. त्याच्यावर चिखली पोलीस ठाण्यात जबरी चोरी, अवैधरित्या शस्त्र बाळगणे, जमाव जमा करणे, गंभीर दुखापत करणे अशा प्रकारचे अनेक गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे अखेर चिखली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर यांनी तडीपारचा प्रस्ताव पोलीस उपायुक्त शिवाजी पवार यांच्याकडे पाठवला होता.
दोन सराईत गुन्हेगारांवर मोक्काअंतर्गत कारवाई
कोयत्याचा धाक दाखवून लूटमार करणाऱ्या प्रकाश उर्फ गणेश नामदेव श्रीगोंड आणि साथीदार महादेव दुन्डप्पा दिंडुरी या दोघांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. पैकी प्रकाश उर्फ गणेश नामदेव श्रीगोंड याच्यावर चिखली, भोसरी, वाकड, सोलापूर दक्षिण या परिसरात जबरी चोरी, चोरी, घरफोडी, धारदार शस्त्र बाळगणे असे एकूण १८ गुन्हे दाखल आहेत. त्याच्या साथीदारावर दहा गुन्हे दाखल आहेत. चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील परिसरात दहशत पसरवणाऱ्या या दोघांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. आतापर्यंत चिखली पोलिसांनी तीन गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई केलेली आहे.