पिंपरी चिंचवड पोलिसांना नाकाबंदी दरम्यान मुंबई पुणे द्रुतगती मार्ग येथी उर्से टोल नाका येथे एका कार मध्ये ५० लाख रुपयांची रोकड आढळून आली आहे. संबंधित व्यक्तीकडे चौकशी केली असता त्याला या रकमेबाबत योग्य माहिती देता आली नसल्याने रोकड जप्त करण्यात आली आहे. तसेच याप्रकरणी पोलिसांकडून चौकशी केली जात आहे.
पोलीस उपायुक्त बापू बांगर यांनी दिलेल्या माहितीनुसार, लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड पोलिसांनी हद्दीमध्ये नऊ ठिकाणी नाकाबंदी लावली आहे. पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर उर्से टोलनाका येथे देखील नाकाबंदी करण्यात आली आहे. मंगळवारी (दि. २६) उर्से टोलनाका येथे शिरगाव पोलीस वाहनांची तपासणी करत असताना त्यांना एका स्कॉर्पिओ मध्ये ५० लाख रुपये रोख रक्कम मिळाली .
पोलिसांनी संबंधित चालकाकडे रकमेबाबत खुलासा मागितला. मात्र त्यास योग्य खुलासा करता आला नाही. त्यामुळे पोलिसांनी ती रक्कम जप्त केली आहे. या प्रकरणाची पोलिसांकडून चौकशी केली जात असल्याचेही पोलीस उपायुक्त बापू बांगर यांनी सांगितले.