देहूरोड : भरधाव जाणाऱ्या दुचाकीने धडक दिल्याने पादचारी तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना ८ एप्रिल रोजी रात्री नऊ वाजताच्या सुमारास मुंबई बंगळुरू महामार्गावर शितळा नगर मामुर्डी येथे घडली.
नगर अली एस के (वय २३, रा. शितळा नगर, मामुर्डी, देहूरोड. मूळ रा. पश्चिम बंगाल) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी सिराज हुसेन शेख (वय ६३, रा. देहूरोड) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कौशल कुमार (वय २२, रा. पिंपरी. मूळ रा. बिहार) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शेख यांचे देहूरोड मध्ये चिकनचे दुकान आहे. त्या दुकानात नगर अली हा काम करत होता. रमजान ईदचा सण असल्याने तो आठ एप्रिल रोजी रात्री सलून मध्ये गेला होता. केस कापून परत येत असताना त्याला कौशल कुमार (रा. भट नगर पिंपरी, मूळ राहणार बिहार) याने त्याच्या ताब्यातील के.टी.एम. दुचाकी भरधाव चालवून धडक दिली. त्यामध्ये गंभीर जखमी झाल्याने नगर अली याला देहूरोड येथील आधार हॉस्पिटल या खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी नगर अली याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले व उपचारास सुरवात केली मात्र उपचारादरीमं याचा मृत्यू झाला. तसेच या अपघातात कौशल कुमार देखील जखमी झाला आहे. पुढील तपास देहूरोड पोलीस करीत आहेत.