हिंजवडी: जुनी भांडण मिटवुन घेण्यासाठी तरुणाला बोलवून घेऊन त्याला बेदम मारहाण केली. तसेच त्याच्याकडील १२०० रुपये जबरदस्तीने काढून घेतले. याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. ही घटना शनिवारी (दि. १३) सायंकाळी कासारसाई येथे घडली.
शिवराज मारुती शेडगे (वय २१), अजय उर्फ सोन्या चंद्रकांत साठे (वय २३), शुभम शंकर क्षीरसागर (वय १९), रितेश कडूबा राठोड (वय १९, सर्व रा. कासारसाई, ता. मुळशी) यांच्यावर भा.दं.वि. कलम ३९४, ५०६(२) ३४१ सह आर्म अॅक्ट, महाराष्ट्र पोलीस कायदा, क्रिमीनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. याप्रकरणी आर्यन अशोक खैरे (वय २३, रा. कासरसाई, ता. मुळशी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आर्यन खैरे याला जुनी भांडणे मिटविण्यासाठी कासारसाई येथील स्मशानभूमी समोर असलेल्या शंकराच्या मंदिरासमोर बोलावून घेतले.
तिथे त्याला शिवीगाळ, दमदाटी करून मारहाण केली. आरोपींच्या भीतीने आर्यन त्याच्या कारमध्ये बसून निघून जात असताना आरोपींनी त्याचा दुचाकीवरून पाठलाग केला. दुचाकी आडव्या लावून आरोपींनी आर्यनची कार आडवली.
आर्यन याला कारमधून ओढून पुन्हा मारहाण केली. आरोपी शिवराज त्याच्या गाडीला असलेला कोयता काढून आर्यनच्या अंगावर धावून येत असताना अजय साठे याने हातातील कड्याने आर्यनला मारहाण केली. यामध्ये कानाच्या मागे दुखापत होऊन आर्यन गंभीर जखमी झाली. आरोपींनी आर्यन यांच्या खिशातून १२०० रुपये जबरदस्तीने काढून नेले. पुढील तपास हिंजवडी पोलीस करीत आहेत.