
पिंपरी : पिंपरी-चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशनच्या वतीने शहरातील सर्व दुय्यम निबंधक कार्यालयात सोमवारी (दि. १४) काम बंद आंदोलन करण्यात आले. दस्त नोंदणी मधील अडचणी सोडविण्याच्या तसेच अन्य मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले आहे.
पुणे जिल्ह्यातील प्रत्येक दुय्यम निबंधक कार्यालयात दररोज सुमारे 50-60 दस्त नोंदणीसाठी सादर केले जातात. मात्र दुय्यम निबंधक कार्यालयातील सर्व्हर वारंवार बंद अथवा संथ असते. त्यामुळे दस्त नोंदणी होत नाही. या कार्यालयातील अडचणींमुळे पक्षकार आणि वकिलांच्या वेळे सह आर्थिक नुकसानाला सामोरे जावे लागत आहे.

दुय्यम निबंधक कार्यालयातील सर्व्हर अत्याधुनिक करण्याच्या प्रमुख मागणीसाठी पिंपरी-चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशनने सोमवारी एक दिवसीय काम बंद आंदोलन केले. बार असोसिएशन ने निगडी, चिंचवड, भोसरी येथील दुय्यम निबंधक कार्यालयात निवेदन देखील दिले आहे.
नोंदणी कार्यालयात नोंदणी अधिकारी आणि कार्यालयातील कर्मचारी यांनी वकिलांसोबत उद्धटपणे व मानहानीकारक बोलणे थांबवले पाहिजे. दस्त नोंदणी कार्यालयातील ऑपरेटरचा मनमानी कारभार थांबला पाहिजे. महिला व कनिष्ठ वकिलांची अडवणूक थांबवून महिलांना योग्य वर्तणूक दिली पाहिजे. नोंदणी कार्यालयात पिण्याचे पाणी, स्वच्छ स्वच्छतागृह, महिलांसाठी प्रतीक्षा कक्ष अशा सुविधा निर्माण करणे, सकाळी पावणे दहा वाजता दुय्यम निबंधक कार्यालयाचे कामकाज सुरु करावे, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या आहेत.












