पिंपरी चिंचवड प्रतिनिधी
दि.२७ : पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशन व लोकमान्य हॉस्पिटल, चिंचवड यांच्या संयुक्त विद्यमाने महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. वकिली व्यवसाय हा अत्यंत ताणतणावाचा असल्याने वकील वर्गाला मोठ्या मानसिक ताणतणावाला सामोरे जावे लागते. परिणामी वकिलांना गंभीर आजारांना सामोरे जावे लागते.
याचीच दखल घेऊन बार असोसिएशनतर्फे महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. सदर महाआरोग्य शिबिराला १०० पेक्षा जास्त वकिल बंधू व भगिनी, न्यायाधीश वर्ग, न्यायालयीन कर्मचारी यांनी लाभ घेतला. बीपी, शुगर, हृदयरोग, हाडांचे आजार, पोटाचे आजार अशा १५ पेक्षा जास्त आजारांवर तज्ज्ञ डॉक्टर यांनी वकिलांना मोफत उपचार व विविध चाचण्या करून मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमासाठी बार असोसिएशनचे मा.अध्यक्ष ॲड. गोरखनाथ झोळ हे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते तर प्रमुख पाहुणे म्हणून बार असोसिएशनचे मा. अध्यक्ष ॲड. सचिन थोपटे उपस्थित होते. कार्यक्रमात बार असोसिएशनतर्फे मान्यवरांचा सत्कार करण्यात आला तसेच लोकमान्य हॉस्पिटलच्या व्यवस्थापक डॉ. अर्चना कुडे व डॉ. आशितोषकुमार दुबे यांचेदेखील कमिटीतर्फे सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
लोकमान्य हॉस्पिटलच्या सर्व सहकारी स्टाफला कमिटीतर्फे प्रशस्तीपत्र देण्यात आले. कार्यक्रम प्रसंगी बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. नारायण रसाळ, उपाध्यक्ष ॲड. जयश्री कुटे, सचिव ॲड. गणेश शिंदे, सहसचिव ॲड. मंगेश नढे, खजिनदार ॲड. विश्वेश्वर काळजे, ऑडिटर ॲड. राजेश रणपिसे, सदस्य ॲड. सौरभ जगताप, ॲड. प्रशांत बचूटे, ॲड. नितिन पवार, ॲड. पवन गायकवाड व इतर वकील बंधू भगिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व संयोजन ॲड. मंगेश नढे यांनी केले तर आभार ॲड. विश्वेश्वर काळजे यांनी मानले.












