चाकण : तहसिलदाराकडे तक्रार केल्याच्या कारणावरुन एका पत्रकाराला शिवीगाळ करुन मारहाण केली. तसेच त्यांना डांबावून ठेवल्याप्रकरणी तिघांवर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार बुधवारी (दि.१) सायंकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास खेड तालुक्यातील शेलगाव येथे घडला आहे.
याबाबत तुषार राजाराम झरेकर (वय-३३ रा. मु.पो. दत्तवाडी, शेलगाव, ता. खेड) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन विश्वजीत दिक्षित, आकाश शिवले व मारुती शिवले यांच्यावर भा.दं.वि. कलम ३४१, ३२३, ५०४, ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी हे पत्रकार आहेत. शेलगाव येथील माती व मुरुम उपसा करुन त्याची रोडने वाहतूक करण्यात येत आहे.
त्यामुळे वाहतुकीचा, रहीवासी व येणाऱ्या जाणाऱ्यांना याचा त्रास होत आहे.
त्यामुळे फिर्यादी यांनी १० एप्रिल रोजी तहसीलदार यांच्याकडे बातमीकरीता मारुती शेवले यांच्या प्लॉटींगमधून होणाऱ्या उत्खनन विषयी माहिती मागवली होती. याचा राग आरोपींच्या मनात होता.
बुधवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास मारुती शिवले याने फिर्यादी यांना फोन करुन भेटण्यासाठी प्लॉटींवर बोलावून घेतले. त्यावेळी दोघांमध्ये संभाषण सुरु असताना मारुती शिवले यांच्याकडे काम करणारे विश्वजीत शिवले व आकाश शिवले यांनी फिर्यादी यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. तर मारुती शिवले याने फिर्यादी यांची गच्ची पकडून तहसिलदार यांच्याकडे आमच्याविरोधात तक्रार करतो का असे म्हणत कानशिलात लगावली. तसेच खालीपाडून मारहाण करत त्यांना डांबून ठेवल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. तुषार झरेकर यांनी दिलेल्या तक्रारीवरुन तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.