पिंपरी : जुन्या भांडणातून सहा जणांच्या टोळीने दोघांना कोयत्याने बेदम मारहाण केली. कोयता हवेत फिरवून ‘आम्ही इथले भाई आहोत’ असे म्हणत परिसरात दहशत निर्माण केली. ही घटना १६ मे रोजी सायंकाळी भोसरीतील चक्रपाणी वसाहतीत घडली.
याप्रकरणी ओंकार मल्हारी दळवी (वय २२, रा.दिघी), योगेश जगन्नाथ मुळे (वय २१), गणेश कृष्णा गवारी ( वय १९, दोघे रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी), विजय विरेंद्र चव्हाण (वय १८, रा.सद्गुरूनगर, भोसरी) या चौघांना अटक केली आहे. तेजस डोंगरे आणि सचिन येरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत विशाल विठ्ठल साळवे (वय १९, रा. भोसरी) याने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादी विशाल हा भोसरीतील देवकर वस्ती येथे थांबला होता. त्यावेळी आरोपी योगेश, विजय तेथे आले. जुन्या भांडणाचा राग मनात धरून विशालसोबत वाद घालण्यास सुरुवात केली. योगेशने ओंकारला बोलावून घेतले. आरोपी ओंकार याने हातात कोयता घेऊन तुम्ही आमच्या गॅंगला दम देता काय असे म्हणत शिवीगाळ केली. आरोपींनी विशाल याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच विशालचा साथीदार लक्ष्मण आखाडे याला पकडून ठेवले. आरोपी ओंकार याने विशालच्या पाठीत आणि लक्ष्मण याच्या डोक्यात कोयता मारून गंभीर जखमी केले. तसेच कोयता हवेत फिरवून मी आताच ‘मोक्का’मधून बाहेर आलो आहे, आम्ही इथले भाई आहोत असे म्हणत परिसरात दहशत निर्माण केली. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.