पिंपरी साई चौकातील शिव गारमेंट्स, संजय ट्रेडलिंक या दोन दुकानातून १० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ब्रँडेड कंपनीचा लोगो वापरुन बनावट कपड्यांची विक्रीप्रकरणी या दोन दुकानदारांवर कॉपीराईट अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई गुरुवारी (दि.३०) दुपारी दोन ते सायंकाळी साडेपाच या वेळेत करण्यात आली. या कारवाईत
याप्रकरणी महेश विष्णू कांबळे (वय-४१ रा. जनवाडी, शिवाजीनगर, पुणे) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. विष्णू कांबळे यांच्या तक्रारीवरून संजय चंद्रकांत भोजवानी (रा. ज्योतीबा मंगल कार्यालयाजवळ, काळेवाडी, पिंपरी) व संजू दिलीप बसतांनी (रा. एसके पलास पॅराडाईज, नव महाराष्ट्र शाळेजवळ, पिंपरी) यांच्या विरोधात कॉपीराइट कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी महेश विष्णू हे युनायटेड अँड युनायटेड ट्रेडमार्क अँड अॅथोरिटी नवी दिल्ली या कंपनीत तपासी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या कंपनीकडून कॉपी राईट हक्काचे कोणी उल्लंघन करत असेल तर त्याच्या विरोधात कॉपीराईट कायदा व ट्रेडमार्क कायद्याप्रमाणे कारवाई करण्यात येते. सध्या त्यांच्या कंपनीकडे अंडर आर्मर, नायके, जॉर्डन या विदेशी ट्रेडमार्क कंपनीचे अधिकृत कॉपीराईट व ट्रेडमार्क कायद्याप्रमाणे कारवाई करण्याचे अधिकार आहेत.
दरम्यान, पिंपरी कॅम्प येथे काही दुकानांमध्ये अंडर आर्मर, नायके, जॉर्डन कंपनीचा बनावट लोगो वापरुन कपडे विक्री होत असल्याची माहिती त्यांना मिळाली. फिर्य़ादी यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी फिर्यादी यांच्यासह साई चौक परिसरातील दुकानात जाऊन पाहणी केली असता बनावट कपड्याची विक्री केली जात असल्याचे समोर आले.
आरोपींनी त्यांच्या दुकानात फिर्यादी यांच्या कंपनीचे स्वामित्व असलेल्या अंडर आर्मर, नायके, जॉर्डन कंपनीचे बनावट टी शर्ट, शॉर्ट पॅन्ट, ट्रॅक पॅन्ट, जॅकेट विक्री करताना व विक्रीसाठी ठेवल्या असताना आरोपी मिळून आले. या कारवाईत पोलिसांनी १० लाख ३१ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पुढील तपास वरीष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कडलग करीत आहेत.