पुणे प्रतिनिधी
पुणे : राज्य शासनाने महापालिकेच्या आरोग्य विभाग प्रमुख पदावरून डॉ. भगवान पवार यांची तडकाफडकी बदली केली होती. त्यास महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने (मॅट) स्थगिती देत पवार यांना विनाविलंब पुन्हा याच पदावर नियुक्त करावे असे आदेश महापालिका आणि राज्य शासनाला दिले आहेत.
मार्च २०२३ मध्ये डॉ. आशिष भारती यांची बदली झाल्यानंतर त्यांच्या जागेवर जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार यांची नियुक्ती करण्याचे आदेश राज्य सरकारने काढले होते. महापालिकेच्या भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. आशिष बंगिनवार यांना लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले होते.
यानंतरच सप्टेंबरमध्ये डॉ. पवार यांची राज्य शासनाच्या अंधत्व नियंत्रण कार्यक्रमाच्या सहाय्यक संचालक पदावर बदली केली. अवघ्या पाच महिन्यात पवार यांची बदली झाल्याने महापालिकेत चांगलीच चर्चा रंगली होती.
शासनाच्या या आदेशाविरोधात पवार यांनी मॅटकडे दाद मागितली होती. त्यावर झालेल्या सुनावणीमध्ये मॅटने डॉ. पवार यांच्या बाजूने निकाल दिला. त्यानुसार या पदावर पुन्हा त्वरित नियुक्ती करण्याचे आदेश दिले.
महापालिकेने यानंतर राज्य शासनाच्या नगरविकास विभागाकडे अभिप्राय मागितला. त्यावर नगर विकास विभागाच्या उप सचिव प्रियांका कुलकर्णी छापवाले यांनी डॉ. पवार यांना महापालिकेच्या आरोग्य प्रमुखपदी रुजू करून घ्यावेत असे आदेश दिले आहेत.
तसेच मॅटचे आदेश सुस्पष्ट असताना पुन्हा यात नगरविकास विभागाचा अभिप्राय आवश्यक नाही. त्यामुळे विनाकारण अनावश्यक पत्रव्यवहार करून वेळा वाया घालू नये असेही शासनाने महापालिकेला बजावले आहे.












