हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात मुंबई, पुणे, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्गमध्ये उद्यापासून पुढील काही दिवस जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यात आजपासून पुढील काही दिवस हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
त्यामुळे येथे यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर मराठवाडा व विदर्भात देखील पाऊस होण्याची शक्यता आहे. विदर्भातील सर्व जिल्ह्यांना पुढील पाच दिवस वादळी वारे, मेघ गर्जना, विजांचा कडकडाट व ताशी ४० ते ५० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे विदर्भातील जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रात पुणे व सातारा जिल्ह्यात १९ जून ते २२ जूनच्या काळात व कोल्हापूरला २२ जूनला घाट विभागात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे. तर उर्वरित जिल्ह्यांमध्ये पुढील पाच दिवस हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
मराठवाड्यात आज हिंगोली व नांदेडमध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जना व वीजांचा कडकडाट तसेच वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. यामुळे या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर उर्वरित जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.