पुण्यातील कल्याणीनगर परिसरात झालेल्या अपघाताप्रकरणी राजकीय क्षेत्रातून आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. या निमित्ताने कसबा पेठेचे आमदार रवींद्र धंगेकर, वडगावशेरी मतदारसंघाचे आमदार सुनील टिंगरे आणि पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यात कलगीतुरा रंगला आहे. या कलगीतुऱ्यात आता वसंत मोरे यांनीही उडी घेतली असून या प्रकरणी राजकारण करणाऱ्यांना त्यांनी खडेबोल सुनावले आहेत. त्यांनी यासंदर्भात आज सोशल मीडियावर पोस्ट लिहिली.
वसंत मोरे पोस्टमध्ये म्हणाले, “कोरेगाव पार्कमध्ये जो अपघात झाला तो दुर्दैवीच होता. पण त्यामागून जे राजकारण चालू दिसतंय त्यामध्ये आपल्या पुण्याच्या काही नेत्यांची कीव येते. नाईट लाईफ काय फक्त कोरेगाव पार्क मध्येच आहे का? ज्यांनी पुढाकार घेऊन कारवाया लावल्या त्या कोथरूडमधील पुढाऱ्यांनी जरा आपल्या भागातील नाईटलाईफ विषयी लक्ष द्यावे, सोबतच भुगाव, पिरंगुट या भागाकडे म्हणजेच मुळशीकडेही लक्ष द्यावे.”
“तसेच ज्यांनी निवेदन दिली त्यांनी सुद्धा एनआयबीएम कोंढवा भागाकडे सुद्धा लक्ष द्यावे. नाहीतर असं म्हणावं लागेल कोरेगाव पार्कमध्ये जाणारी तरुण पिढी दारू पिण्यासाठी जाते आणि वरील भागांमध्ये नाईट लाईफसाठी जाणारी तरुण पिढी नारळाचे पाणी पिण्यासाठी जाते का?”, असा उपरोधिक सवालही त्यांनी उपस्थित केला.
“कोणकोणत्या नेत्याचे कुठे कुठे नाईट लाईफमध्ये लागेबांधे आहेत, भविष्यात जर त्यांच्यावर कारवाई झाली नाही तर जागेवर जाऊन लाईव्ह केले जातील. पोलीस यंत्रणेने फक्त कोरेगाव पार्क टार्गेट न करता संपूर्ण पुणे शहर सुद्धा टार्गेट करावे. अन्यथा वंचित बहुजन आघाडी म्हणून जर कुठे हिंसक आंदोलन झाली तर त्याला संपूर्णपणे जबाबदार ही भ्रष्ट यंत्रणा असेल”, असा इशाराच त्यांनी या माध्यमातून दिला.
तिघांना २४ मे पर्यंत न्यायालयीन कोठडी
कल्याणीनगर भागात रविवारी मध्यरात्री भरधाव मोटारीने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार संगणक अभियंता तरुण आणि त्याची मैत्रीण मृत्युमुखी पडल्याची घटना घडली.त्यानंतर मोटारचालक अल्पवयीन मुलाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. अल्पवयीन मुलाला मद्या उपलब्ध करून देणे, तसेच त्याला मोटार दिल्याप्रकरणी अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अगरवाल याला अटक करण्यात आली. मुलाने ज्या पबमध्ये मद्या प्राशन केले होते. त्या पबमधील कर्मचारी शेवानी आणि गावकर यांना बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले. तिघांना २४ मे पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला.
..तर मुलाला गाडी चालवायला दे
पोलिसांनी अल्पवयीन मुलगा चालवत असलेल्या मोटारीच्या चालकाचा जबाब नोंदवला आहे. मुलाने जर गाडी चालवायला मागितली, तर त्याला गाडी दे आणि तू बाजूला बस, अशी सूचना अगरवाल याने दिली होती. अल्पवयीन मुलगा ज्या हॉटेल, पबमध्ये पार्टीसाठी जाणार आहे, त्या हॉटेल आणि पबमध्ये मद्या मिळते, याची माहिती अगरवाल याला होती. त्याने मुलाला पार्टीला जाण्यास परवानगी दिली. पार्टीसाठी जाताना त्याला पैसे (पॉकेटमनी) दिले होते का, पार्टीसाठी अल्पवयीन मुलाला नेमके किती पैसे दिले होते किंवा क्रेडिट कार्ड दिले होते काय, अल्पवयीन मुलाबरोबर पार्टीसाठी आणखी कोण कोण होते, याबाबत आरोपीकडे सखोल तपास करायचा आहे. त्यासाठी आरोपींना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात यावी, असा युक्तिवाद अतिरिक्त सरकारी वकील विद्या विभूते आणि योगेश कदम यांनी केला.