पुणे : पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) प्रशासनाने आता कोणत्याही मेट्रो स्थानकावरून शहराच्या विविध भागात प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ‘शेअर अ रिक्षा’ योजना सुरू करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. पुणे मेट्रोच्या वापरकर्त्यांना चांगली कनेक्टिव्हिटी प्रदान करणे हे या सेवेचे उद्दिष्ट आहे.
पुणे आरटीओ संजीव भोर म्हणाले, “आम्ही शहरातील १८ मेट्रो स्थानकांसह रेल्वे स्थानकांवरून ‘शेअर अ रिक्षा’ सुरू करण्याची परवानगी दिली आहे. त्यासाठी किती भाडे आकारायचे याचाही निर्णय घेण्यात आला आहे. यासोबतच मीटर रिक्षातून प्रवास करू इच्छिणाऱ्यांनाही ही सुविधा मिळणार आहे. याचा फायदा नागरिकांना तसेच रिक्षाचालकांना होणार आहे.
वनाझ मेट्रो स्टेशन, आनंद नगर, आयडियल कॉलनी, नल स्टॉप, गरवारे कॉलेज, पुणे महापालिका, दिवाणी न्यायालय, मंगळवार पेठ, पुणे स्टेशन, रुबी हॉल, शिवाजी नगर, बोपोडी, दापोडी, फुगेवाडी, कासारवाडी, भोसरी फाटा, संत तुकाराम नगर पिंपरी चिंचवड महापालिका या 18 मेट्रो स्थानकांवरून ही सेवा चालवली जाणार आहे.
आरटीओने पुणे रेल्वे स्थानकासह सर्व मेट्रो स्थानकांचे सर्वेक्षण केले. त्यानंतर मेट्रो स्थानकांवरून ऑटोरिक्षा सेवा सुरू करण्याच्या योजनेला मंजुरी देण्यात आली.
1 ऑगस्ट रोजी 2 नवीन मेट्रो मार्गांचे उद्घाटन झाल्यानंतर आता पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये मेट्रो मोठ्या प्रमाणात धावू लागली आहे. मेट्रो नेटवर्कच्या विस्तारामुळे नागरिकही मेट्रो प्रवासाला प्राधान्य देत आहेत. त्यामुळे जवळच्या मेट्रो स्थानकापर्यंत पोहोचण्यासाठी फीडर बस सेवेसह मेट्रो स्थानकातून शहराच्या इतर भागात जाण्यासाठी आरटीओ प्रशासनाकडून सामायिक रिक्षा योजना सुरू करण्यात आली आहे.
पुणे आरटीओचा ‘शेअर अ रिक्षा’ योजनेला हिरवा झेंडा












