
पुणे : पुण्यातील 178 स्कूल बस आणि 84 अन्य वाहनांवर सुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळून आल्याने पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) त्यांच्यावर कारवाई केली आहे. नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी 29 लाख 75 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.
याबाबत माहिती अशी की, पोलीस आयुक्तालयात जिल्हास्तरीय शालेय वाहतूक सुरक्षा समितीची बैठक झाली. पुण्याचे पोलिस आयुक्त रितेश कुमार म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या वाहतुकी दरम्यान अपघात किंवा इतर जीवित, शारीरिक आणि मानसिक धोका टाळण्यासाठी स्कूल बसने नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. स्कूल बसमध्ये मदतनीस (अटेंडंट) आणि मुलींना घेऊन जाणाऱ्या स्कूल बसमध्ये महिला मदतनीस असणे बंधनकारक आहे. या बसेजचे चालक चांगले प्रशिक्षित, नैतिकदृष्ट्या सक्षम, चांगले ट्रॅक रेकॉर्ड असलेले असावेत. या सर्व गोष्टींची शालेय परिवहन समितीने खात्री करून घ्यावी.
पुणे आरटीओचे उपायुक्त संजीव भोर म्हणाले, “जिल्ह्यातील स्कूल बस विद्यार्थी परिवहन समितीच्या कामात सुलभता आणण्यासाठी https://schoolbussafetypune.org ही वेबसाइट सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यात 9,663 हजार स्कूल बस असून, 5,731 शाळांनी या वेबसाइटवर नोंदणी केली आहे. त्यावर उर्वरित सर्व शाळांची नोंदणी करण्यासाठी शिक्षण विभागाने पुढाकार घ्यावा. शालेय विद्यार्थ्यांच्या अवैध वाहतुकीला आळा घालण्यासाठी परिवहन विभागाने 1 जानेवारी ते 10 जुलै 2023 दरम्यान 709 स्कूल बस आणि 417 इतर वाहनांची तपासणी केली. यामध्ये 178 स्कूल बस आणि 84 इतर वाहने दोषी आढळून आली असून 35 वाहने जप्त करण्यात आली आहेत. या कारवाईत नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी २९ लाख ७५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
पोलिस सहआयुक्त संदीप कर्णिक, पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर, प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे, पुणे ग्रामीणचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक डॉ.मितेश घट्टे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर आदी उपस्थित होते.












