पुणे : पुण्यातील कल्याणी नगर परिसरात रविवारी मध्यरात्री भरधाव वेगात असलेल्या एका आलिशान कारने दुचाकीला धडक दिली. या अपघातात एका तरुणीचा व तरुणाचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर कल्याणी नगर, कोरेगाव पार्क या परिसरातील रात्रि उशिरापर्यंत चालणाऱ्या रेस्टोबार व पब चा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दरम्यान, कल्याणी नगर, कोरेगाव पार्क परिसरातील नागरिकांनी रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या रेस्टोबार व पबवर कारवाई करण्यासंदर्भात प्रशासनाकडे अनेक वेळा तक्रारी केल्या. मात्र, याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.
कोरेगाव पार्क रेसिडेन्ट वेल्फेअर असोसिएशनचे रोहन देसाई म्हणाले, रविवारी रात्री घडलेली घटना धक्कादायक आहे. कल्याणी नगर रेसिडेन्शियल परिसरात जे वर्षानुवर्षे चालू असणाऱ्या रेस्टोबार आणि पब विरुद्ध तक्रार करूनही यावर काहीच होत नाही. त्यामुळे या परिसरातील नागरिक खूप वैफल्यग्रस्त झाले आहेत. इथल्या नागरिकांचे रोजचे जीवन खूप धोकादायक बनले आहे. या बाबीवर प्रशासनाचे लक्ष खेचण्यासाठी आणि कायमचा तोडगा काढण्यासाठी येथील सुजाण नागरिक इथे बसून कॅण्डल लावून सांत्वन व्यक्त करणार आहेत. पुण्यातील सर्वात शांत समजल्या जाणाऱ्या कोरेगाव पार्क ,कल्याणी नगर अशा बऱ्याच परिसरामधील हा प्रश्न खूप वर्षापासून ज्वलंत आहे. पुण्याचे तत्कालीन सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, सध्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सोशल सिक्युरिटी सेल चे अधिकारी या सर्वांनी वारंवार नागरिकांना मदत केलेली आहे.
पुणे पोलिसांच्या कारवाईनंतर सुद्धा पुणे महानगरपालिका आणि राज्य उत्पादन शुल्क विभाग नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रेस्टोबार आणि पब्स यांचे परवाने रद्द करू शकले नाहीत. यामुळे या परिसरातील महिलांच्या सुरक्षीतेचा आणि नागरिकांच्या जीवाचा धोका वाढत आहे.