कात्रज येथील जलतरण तलावात पोहत असताना एका तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली होती. ही घटना कात्रज लेकटाऊन येथील शंकरराव राजाराम कदम जलतरण तलाव येथे २० एप्रिल रोजी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली होती. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात जलतरण तलावाचे व्यवस्थापक, कोच आणि लाईफगार्ड यांच्यावर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.
साहिल महेंद्र उके (वय-२१ रा. साईनगर, कोंढवा बुद्रुक) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी साहिल याचे वडिल महेंद्र शंकर उके (वय-५९ रा. मु.पो. वरडी ता. मोहाडी, जि. भंडारा) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन यश उर्फ रॉयल एक्वाटिक क्लबचे मालक व व्यवस्थापक रुपेश शिर्के, कोच संतोष कांबळे, लाईफगार्ड प्रसाद ढोके, आदित्य गोरे, संदीप सलगर यांच्यावर भा.दं.वि. कलम ३०४, ३४ नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मुलगा साहिल उके हा लेकटाऊन कात्रज येथील शंकरराव राजाराम कदम जलतरण तलाव येथे मागील तीन महिन्यापासून पोहण्याचे प्रशिक्षण घेत होता. २० एप्रिल रोजी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास साहिल पोहण्यासाठी स्विमींग पुलातील पाण्यात उतरला. मात्र, दम लागल्याने तो पाण्यात बुडाला. त्याला तातडीने रुग्णालयात नेले असता त्याचा मृत्यू झाला होता. घटना घडली त्यावेळी जलतरण तलाव परिसरात लाईफगार्ड तसेच कोच उपस्थित नव्हते. त्यामुळे साहिल याला वेळेवर वैद्यकीय मदत मिळू शकली नाही. आरोपींच्या निष्काळजीपणामुळे व हलगर्जीपणामुळे मुलाचा मृत्यू झाल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन आरोपींना अटक केली आहे. पुढील तपास भारती विद्यापीठ पोलीस करीत आहेत.