पुणे : शिरुर तालुक्यातील मलठण येथील शिंदेवाडी येथे खंडोबा देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या बैलगाडा शर्यतीत वडिलोपार्जित जमीन वाटपाच्या कारणावरून ज्ञानोबा शिंदे, भानुदास शिंदे व संजय शिंदे यांच्यात तुंबळ हाणामारी झाली. यात गंभीर जखमी झालेल्या संजय शिंदे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरुर तालुक्यातील मलठण येथील शिंदेवाडी येथे रविवारी (दि.२८) खंडोबाची यात्रा होती. यात्रेनिमित्त बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. बैलगाडा घाटात संजय शिंदे (रा. रावडेवाडी, ता. शिरुर) शर्यत पाहण्यासाठी आले होते. शर्यत पाहात असताना भानुदास शिंदे यांनी तेथे येऊन ‘तु लई माजलाय, आम्हाला जमीन वाटून मागतो काय, तुला आता जिवंत सोडत नाही, तुला आता खल्लासच करतो’, असे म्हणून संजय शिंदे यांना लाकडी दांडक्याने मारहाण केली.
तसेच ज्ञानोबा शिंदे यांनी देखील ‘आता याला जीवच मारुन टाकतो’, असे म्हणून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने नागरिकांनी संजय शिंदे यांना उपचारासाठी शुरुर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. संजय शिंदे यांच्यावर उपचार सुरु असताना उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
याप्रकरणी गंगूबाई रखमा शिंदे (वय-६२ रा. रावडेवाडी, ता.शिरुर) यांनी शिरुर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी भानुदास ज्ञानोबा शिंदे, ज्ञानोबा गोविंद शिंदे (रा. शिंदेवाडी-मलठण) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक जोतीराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अमोल पन्हाळकर करीत आहेत.