पुणे: रात्रीच्या वेळी रस्त्यलगत उभ्या केलेल्या वाहनांमधील डिझेल चोरणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या टोळीला पुणे ग्रमीण पोलिसांच्या आळेफाटा पोलिसांनी अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपींकडून दोन कार व डिझेल असा एकूण १७ लाख ५२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
कुणाल रोहिदास बोंबले, ओमकार काळुराम देवकर, राहुल संजय हिंगे (सर्व रा. राजगुरुनगर, जि. पुणे) अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३ एप्रिल रोजी रात्रीच्या वेळी आळेफाटा परिसरातील भोसले पेट्रोल पंपासमोर असलेल्या ट्रान्सपोर्ट ऑफिससमोर उभ्या असलेल्या हावामधून ६० लिटर डिझेल चोरीला गेले होते. याप्रकरणी रुपेश ज्ञानेश्वर वाळूंज यांनी आळेफाटा पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली. त्याच रात्री बाह्यवळण पुलाजवळ लावलेल्या योगेश पाडेकर व सुदर्शन जाधव यांच्या वाहनामधून डिझेल चोरी झाली होती.
या गुन्ह्यांचा तपास करत असताना आळेफाटा पोलिसांना राजगुरुनगर येथील तिघेजण वाहनांमधील डिझेल चोरी करत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार तपास पथकाने राजगुरुनगर येथे आरोपींचा शोध घेऊन तिघांना ताब्यात घेतले. आरोपींनी आळेफाटासह मंचर, पारगाव कारखाना हद्दीत वाहनामधून डिझेल चोरल्याचे कबुल केले आहे. त्यांच्याकडून ५७५ लिटर डिझेल व गुन्ह्यात वापरलेल्या कार (एम.एच. ०४ एफ. एफ. ००४१) व कार (एम.एच. ०४ एच.एफ. ३८८८) असा एकूण १७ लाख ५२ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला
ही कामगिरी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर, पोलीस निरीक्षक सतीश होडगर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सुनील बडगुजर, सहाय्यक फौजदार चंद्रा डुंबरे, पोलीस अंमलदार विनोद गायकवाड, भीमा लोंढे, पंकज पारखे, अमित माळुंजे, हनुमंत ढोबळे, प्रवीण आढारी, नवीन अरगडे यांच्या पथकाने केली.