पुणे : चारचाकी गाडीची धडक दुचाकाली बसली. दुचाकीस्वाराने याबाबत विचारणा केली असता सात जणांच्या टोळक्याने तरुणाला लाकडी काठी, लोखंडी रॉड, हॉकी स्टीकने बेदम मारहाण करुन गंभीर जखमी केले. हा प्रकार रविवारी (दि.१९) मनपा येथील मंगला थिएटरच्या मागे घडला आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे.
याबाबत रुपेश सुरेश तेली (वय-३० रा. जुना तोफखाना, धोबीघाट, शिवाजीनगर, पुणे) यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून श्रीकांत घाग (रा. कसबा पेठ, गणेश मित्र मंडळाजवळ, पुणे), देव शिरोळे, सोहेल सय्यद, कार्तिक, अशोक, लखन शिरोळे, आकाश गायकवाड यांच्यावर भा.दं.वि. कलम ३२५, ३२६, ५०४, ५०६, १४३, १४७, १४९ महाराष्ट्र पोलीस कायदा ३७(१)(३) नुसार गुन्हा दाखल केला आहे. तर देव शिरोळे, सोहेल सय्यद, लखन शिरोळे आणि आकाश गायकवाड यांना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रुपेश हे किराणा सामान आणण्यासाठी जुना तोफखाना येथे गेले होते. त्यावेळी आरोपी श्रीकांत याच्या चारचाकीची धडक फिर्यादी यांच्या दुचाकीला बसली. त्यामुळे दुचाकी खाली पडून गाडीचे हँडल वाकडे झाले. याबाबत विचारणा केली असता श्रीकांतला याचा राग आला. त्याने फिर्यादी यांना शिवीगळ करुन मारहाण केली. विचारपुस केल्याचा राग श्रीकांत याच्या मनात होता.
फिर्यादी कांदे बटाटा घेऊन वडापावच्या गाडी जवळ आले असता, श्रीकांत व इतर आरोपी त्याठिकाणी आले. आरोपींनी फिर्यादी यांना लाठी-काठी, हॉकी स्टीक, व लोखंडी रॉडने तोंडावर मारहाण केली. यामध्ये फिर्यादी यांचे समोरील चार दात पडले. आरोपींनी फिर्यादी यांच्या डोक्यात पाठिमागून मारहाण करुन गंभीर जखमी केले. रुपेश तेली यांनी शिवाजी नगर पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी आरोपींचा शोध घेऊन चौघांना अटक केली आहे. तर तीन फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.