वारजे : पुणे शहरातील वारजे माळवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत खुनाचा धक्कादायक प्रकार आहे. वारजे परिसरात कौटुंबिक वादातून पतीने पत्नीच्या अंगावर डीझेल टाकून पेटवून दिले. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने विवाहितेचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी वारजे माळवाडी पोलिसांनी पतीवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार बुधवारी (दि.२९) दुपारी पावणे एकच्या सुमारास वारजे माळवाडी येथील अहिरे गाव गणपती माथा येथे घडला आहे.
पूजा प्रविण चव्हाण (वय-२६ रा. न्यु अहिरे गाव, गणपती माथा) असे मृत्यू झालेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी आरोपी पती प्रवीण बाबासाहेब चव्हाण (वय-२६) याच्यावर वारजे माळवाडी पोलिसांनी भा.दं.वि. कलम ३०२, ४९८अ नुसार गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पूजा यांचा भाऊ अमोल भाऊराव पवार (वय-२६ रा. न्यु अहिरे गाव, गणपती माथा, शिवणे) यांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या बहिणीचा आरोपी प्रवीण याच्याशी २०१९ मध्ये विवाह झाला होता. लग्नानंतर आरोपीने पूजाला त्रास देण्यास सुरुवात केली. प्रवीण पुजाला घरगुती कारणावरुन मानसिक आणि शारीरिक त्रास देत होता. बुधवारी (दि.२९) दुपारी पावणे एकच्या सुमारास आरोपी प्रविण याने पत्नी पूजाला मारहाण केली. त्यानंतर तिच्या अंगावर डिझेल ओतून तिला पेटवून दिले. यामध्ये पूजा गंभीर जखमी झाल्याने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, तिचा मृत्यू झाला. आरोपी प्रवीण याच्यावरुन खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोज शेडगे करीत आहेत.