पुणे : पुण्य आणि स्वर्गाचे आमिष दाखवून डॉक्टर असलेल्या एका ज्येष्ठ नागरिकाची ५ कोटी ३७ लाख ९० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. हा सर्व प्रकार १७ ऑक्टोबर २०१८ ते ११ एप्रिल २०२४ या कालावधीत एनआयबीएम रोड, कोंढवा येथील मेफअर एलिगंज फेज २ येथे घडला आहे.
याबाबत डॉ. अहमदअली इनामअली कुरेशी (वय-६७) रा. रो हाऊस नं. २०, मेफअर एलिगंज फेज-२, एनआयबीएम रोड, कोंढवा) यांनी शुक्रवारी (दि.१२) कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन सादीक अब्दुलमजीद शेख, यास्मीन सादीक शेख, एतेशाम सादीक शेख, अम्मार सादीक शेख (सर्व रा. हार्मोनी सोसायटी, गुलटेकडी), राज आढाव उर्फ नरसु यांच्यावर आयपीसी ४२०, ४०६, ३२३, ४०६, ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी हे व्यवसायाने डॉक्टर आहेत. आरोपी सादिक शेख याची पत्नी यास्मिन मुले एतेशाम व अम्मार यांनी फिर्यादी यांच्यासोबत चांगले संबंध प्रस्थापित केले. फिर्यादी यांच्यसोबत वेळोवेळी गोड बोलून धार्मिक गोष्टी सांगून त्यांना प्रभावित केले. त्यांना पुण्य कमावून स्वर्ग मिळवण्याचे आमिष दाखवले. तसेच वेळोवेळी फिर्यीदी यांच्या मालमत्तेचे ११ बक्षीसपत्र स्वत:च्या नावावर करुन घेतले.
तसेच फिर्यादी यांच्याकडून रोख रक्कम, सोन्याच्या वस्तू आणि सोन्याचे बिस्किटे इत्यादी कोट्यवधी रुपयांची मालमत्ता उकळली. आरोपींनी संगनमत करुन फिर्यादी यांची ५ कोटी ३७ लाख ९० हजार रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर फिर्यादी यांनी सर्व मालमत्ता परत मागितली. मात्र आरोपींनी मालमत्ता परत देण्यास नकार देऊन फिर्यादी यांची कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तेचा अपहार करुन फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) पाटील करीत आहेत.