पुणे: एका गाडीतून पेट्रोल काढून दुसर्या गाडीत टाकत असताना पेट्रोल चोर असल्याच्या संशयातून बेदम मारहाण केलेल्या २० वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान रविवारी मृत्यु झाला आहे. पोलिसांनी या संदर्भात आदी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करुन तिघांना अटक केली होती. त्यात आता कलमवाढ करून खून करण्यात आला असल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
गौरव संजय कुटे (वय २४), अजिंक्य चंद्रकांत गांडले (वय २०), राहुल सोमनाथ लोहार (वय २३, रा. मानाजीनगर, नर्हे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तर समर्थ नेताजी भगत (वय २०, रा. व्यंकटेश्वरा सोसायटी, नर्हे) असे मृत्यु पावलेल्या तरुणाचे नाव आहे. या गुन्हयात आरोपी असलेले माजी उपसरपंच सुशांत सुरेश कुटे हे फरार झाले असून पोलीस त्यांचा माघावर आहेत.
समर्थचे वडिल नेताजी भगत यांनी याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना २५ नोव्हेबर रोजी पहाटे ६ वाजता घडली होती. समर्थ हा डेक्कन येथील एका खासगी कंपनीत काम करत होता. समर्थ याला पहाटे जायचे होते. त्याच्या गाडीतील पेट्रोल संपल्याने तो दुसर्या गाडीतील पेट्रोल काढत होता. त्यावेळी आरोपींनी त्याला पेट्रोल चोर समजून लाथाबुक्क्यांनी, काठीने तसेच सायकलच्या चैनने बेदम मारहाण केली. त्यात तो गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पाच दिवस समर्थ वर उपचार सुरु होते. उपचार सुरु असतानाच समर्थची प्रकृती खालावत गेली. रविवारी याचा मृत्यु झाला. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून सिंहगड रोड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) उत्तम भजनावळे पुढील तपास करीत आहेत.