क्राईम स्टोरी : पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा आणि १४ पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी बेकायदेशीर रित्या शस्त्र बाळगणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी मोहीम राभवली होती. या मोहिमेंतर्गत पोलिसांनी कारवाई करुन ४२ पिस्तुले ७४ जिवंत काडतुसे असा एकूण १२ लाख ९५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत पोलिसांनी २८ आरोपींना अटक केली आहे.
गुन्हे शाखा युनिट ३ च्या पथकाने २१ मार्च रोजी केलेल्या कारवाईत प्रशांत मगम पवार (वय-२८ रा. सिंहगड रोड) याच्याकडून १ पिस्टल व २ काडतुसे व १ किया कंपनीची कार जप्त केली. तर मेघराज उर्फ पप्पु लक्ष्मण दराडे (वय-३२ रा. अहमदनगर) याच्याकडून ४ पिस्टल व १० काडतुसे, समीर हरिभाऊ हरपुडे (वय-३२ रा. कोथरुड) याच्याकडून १ पिस्टल असा एकूण १९ लाख ४७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सादर आरोपींवर यापूर्वी अपहरण, खंडणी, दरोडा असे गंभीर गुन्हे दाखल आहेत.
तसेच १४ एप्रिल रोजी केलेल्या कारवाईत तडीपार असलेला गुन्हेगार नाव निखील राजु शिरसाठ (वय-२१ रा. धायरी) याला अटक करुन ६ पिस्टल, १० कडतुसे, मोपेड, कोयता असा एकूण २ लाख ८० हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. १५ एप्रिल रोजी केलेल्या कारवाईत तडीपार गुन्हेगार अश्विन बाळकृष्ण लोणारे (वय-२० रा. धाडरी) याला अटक करुन ३ पिस्टल ६ काडतुसे जप्त केली. तर वैभव अनंता तरडे (वय-२३ रा. धायरी) याच्याकडून ३ पिस्टल ६ काडतुसे असा एकूण २ लाख ४८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
२२ मार्च रोजी खंडणी विरोधी पथकाने सुरज रोहिदास खंडागळे (वय-३० रा. वारजे) याला अटक करुन १ पिस्टल व २ काडतुसे असा एकूण ३० हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तर २९ मार्च रोजी केलेल्या कारवाईत सागर गणेश सुतार (वय-२३ रा. वारजे) याला अटक करुन १ पिस्टल व २ काडतुसे असा एकूण ३० हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
१ एप्रिल रोजी खंडणी विरोधी पथक २ ने तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेऊन ५ पिस्टल ११ काडतुसे जप्त केली. तसेच ९ एप्रिल रोजी अजय उर्फ भज्या प्रकाश निकाळजे (वय-३१ रा. कोंढवा बुद्रुक) याला अटक करुन १ पिस्टल, ३ काडतुस असा एकूण २६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. युनिट २ च्या पथकाने ४ एप्रिल रोजी ओमकार विनोद पवार (वय-२५ रा. अपर बिबवेवाडी) याला ताब्यात घेऊन १ पिस्टल व २ काडतुसे असा एकूण ५० हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ९ गुन्हे दाखल करुन १४ आरोपींकडून २८ पिस्टल व ५४ जिवंत काडतुसे जप्त करुन १० लाख ५ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तर १४ पोलीस स्टेशनने १० गुन्हे दाखल करुन १४ आरोपींना अटक करुन १४ पिस्टल २० काडतुसे असा एकूण २ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त प्रवीण पवार, अपर पोलीस आयुक्त गुन्हे शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे 1 सुनिल तांबे, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे -२ सतिस गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप मानकर, श्रीहरी बहीरट, क्रांतीकुमार पाटील, नंदकुमार बिडवई, गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार प्रदिप शितोळे, सुनिल पवार, सुरेंद्र जगदाळे, सचिन अहिवळे, कानिफनाथ कारखेले, महेंद्र कडू, संतोष क्षीरसागर, विजय कांबळे, प्रफुल्ल चव्हाण, विनोद शिवले, अकबर शेख, उज्ज्वल मोकाशी यांच्यासह व १४ पोलीस ठाण्यातील अधिकारी वर पोलीस अंमलदार यांनी केली.