पुणे | प्रतिनिधी
पुणे दि. 31 : पर्वती पोलिसांच्या सतर्कतेमुळे सोनसाखळी चोरांचे जळगाव कनेक्शन उघड झाले आहे. चेन स्नॅचिंग करणाऱ्या दोन टोळ्यांचे सहा सराईत आरोपींना अटक करुन पुणे पोलिसांनी रक्षाबंधनाच्या दिनी महिला भगिनींना अनोखी भेट दिली आहे. पर्वती व विश्रामबाग पोलीस स्थनाकाच्या हद्दीत (दि.२४) रोजी महिलांसोबत चेन स्नॅचिंगचा प्रकार घडला होता.
आकाश ज्ञानेश्वर सूर्यवंशी (वय २५ रा.दत्तनगर, कात्रज, मूळचा जळगाव), लोकेश मुकुंदा महाजन (वय २४ रा. सदर मूळचा जळगाव), प्रसाद ऊर्फ परेश संजय महाजन (वय २५ रा. ज्ञानदेव नगर, जळगाव), संदीप अरविंद पाटील (वय २८ रा. जळगाव), दीपक रमेश शिरसाठ (वय २५ रा. मु. पो. ता. पाचोरा जि. जळगाव) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नावे आहेत.
ई-लर्निंग चौक पर्वती दर्शन येथे रिक्षातून जाणाऱ्या एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र तसेच विश्रामबाग परिसरातील महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चेन स्नॅचिंग प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल केला होता. पोलीस अंमलदारांचे चार तपास पथके तयार करण्यात आली. सदर आरोपी हे संगम ब्रिज पासून मुळ गावी (जळगाव) येथे जाणार असल्याची माहिती पोलीस नाईक प्रकाश मरगजे व किशोर वळे यांना मिळाली. त्या अनुषंगाने पोलिसांनी सापळा रचून आरोपीना ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान भारती विद्यापीठ, बिबवेवाडी, सहकारनगर, विश्रामबाग पोलीस स्थानकच्या हद्दीत इतर साथीदारांच्या मदतीने चेन स्नॅचिंग केल्याचे सांगितले.
सदर आरोपीनी कात्रज परिसरात राहून पुणे शहरात पाच ठिकाणी तर जळगाव, पुणे, अकोला, अमरावती शहरात ३० पेक्षा जास्त चेन स्नॅचिंगचे गुन्हे दाखल आहेत.सदर आरोपीकडून सात लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा सखोल तपास सुरु आहे.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार, सहआयुक्त संदीप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त प्रवीणकुमार पाटील, पोलीस उपायुक्त परिमंडळ ३ सोहेल शर्मा, सह पोलीस आयुक्त आप्पासाहेब शेवाळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे, विजय खोमणे,यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनील जगदाळे, चंद्रकांत कामठे, पोलीस आमदार अमित सुर्वे, अनिस तांबोळी, प्रशांत शिंदे, अमित चिवे,शेख,पाटील, भोसले, दबडे, भोसले, शिंदे, गुन्ला यांनी केले आहे.












