पुणे : पुणे पोलिसांकडून विशेष ऑल आऊट कोम्बिंग ऑपरेशन मोहीम राबविण्यात आली आहे. हि मोहीम सर्व पोलीस ठाणे व गुन्हे शाखेच्या वतीने पोलीस ठाण्यातील अधिकारी व अंमलदार तसेच गुन्हे शाखेची पथके तयार करून राबविण्यात आली होती. हे ऑपरेशन सोमवारी (दि.3) रात्री १० ते मंगळवार (दि.4) मध्यरात्री २ वाजतेच्या कालावधीत राबवण्यात आले आहे.
पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी हॉटेल, लॉज, ढाबे, एस.टी व बस स्थानके, रेल्वे स्टेशन तसेच सार्वजनिक ठिकाणी आढळून येणारे संशयीत व्यक्ती, तसेच गुन्हेगारांची तपासणी करुन कारवाई करण्याचे आदेश दिले होते. या मोहीम दरम्यान जवळपास 1832 गुन्हेगारांची तपासणी करण्यात आली असून 639 गुन्हेगार मिळून आले आहेत.
परिमंडळ 1 मधील 6 पोलीस स्टेशन हद्दीतील कारवाई
परिमंडळ 1 मध्ये मालमत्तेविरुद्धच्या गुन्ह्यातील दोन आरोपींना अटक करुन त्यांच्याकडून 5 लाख 9 हजार रुपये किंमतीचे 25 मोबाईल जप्त केले आहेत. तसेच मोक्का गुन्ह्यातील एक आणि चोरीच्या गुन्ह्यात पाहिजे असलेल्या एका आरोपीला अटक केली आहे. तसेच प्रोव्हिबीशन अॅक्ट नुसार दोन केसेस करुन १७६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच जुगार अॅक्ट प्रमाणे 4 केसेस मधील एका आरोपीला अटक करुन ६७६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला गेला आहे.
परिमंडळ 2 मधील 6 पोलीस स्टेशन हद्दीतील कारवाई
पुणे पोलिसांनी राबवलेल्या विशेष मोहिमेत परिमंडळ २ मध्ये ५ शरिराविरुद्धचे गुन्हे दाखल करण्यात आले असून ७ जणांना अटक केली गेली आहे. तर जुगार अॅक्ट प्रमाणे 3 केसेस मधील 4 आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून ३५३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच प्रोव्हिबीशनमध्ये 5 केसेस मधील 5 आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून ९५२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
परिमंडळ ३ मधील ६ पोलीस स्टेशन हद्दीतील कारवाई
परिमंडळ तीन मध्ये प्रोव्हिबीशनमध्ये 11 केसेस मधील 11 आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून १९,०९० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
परिमंडळ ४ मधील पोलीस स्टेशन हद्दीतील कारवाई
परिमंडळ ४ मधील ६ गुन्हे दाखल करुन ६ आरोपींना अटक करण्यात आली आहे. तब्बल नऊ हजार रुपयांचा गांजा, तंबाखूजन्य गुटखा जप्त केला गेला आहे. तसेच जुगार अॅक्ट प्रमाणे १४ केसेस मधील २२ जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून २०,२६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच प्रोव्हिबीशन अॅक्टच्या 22 केसेस दाखल करुन ३२,२८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
परिमंडळ ५ मधील पोलीस स्टेशन हद्दीतील कारवाई
परिमंडळ ५ मध्ये प्रोव्हिबीशन अॅक्ट नुसार ९ केसेस मधील ९ आरोपींना अटक केली आहे.
त्यांच्याकडून १३,८४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच पाहिजे असलेल्या 3 आरोपींना अटक केली आहे.
विशेष मोहिमेच्या अंतर्गत जुगार अॅक्ट अंतर्गत पोलीस स्टेशनने २१ केसेस दाखल करुन ८२ आरोपींना अटक करुन जुगाराचे साहित्य जप्त केले आहे. तर सीआरपीसी कायद्यांतर्गत ४५ आरोपींविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. तसेच १३ तडीपार गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आली आहे.
प्रोव्हिबीशन अॅक्ट नुसार गुन्हे शाखेने ११ तर पोलीस स्टेशनने ४९ केसेस दाखल करुन १ लाख २४ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या ऑपरेशन मध्ये ४५५ हॉटेल, ढाबे व लॉज तपासण्यात आले. तसेच ८५ एस टी स्टँड, रेल्वे स्थानक, निर्जन ठिकाणे चेक करण्यात आली. तसेच २८ ठिकाणी नाकाबंदी करुन ३२८२ संशयित वाहन चालकांना चेक करुन ४७५ जणांवर १ लाख २२ हजार रुपयांची दंडात्मक कारवाई केली. वाहतुक शाखेकडून ११२९ संशयित वाहन चालकांना चेक करुन ४७६ जणांवर ४ लाख ८ हजार ६०० रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्या आदेशान्वये पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे, अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग प्रवीण पाटील, अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग रंजन कुमार शर्मा, पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे, पोलीस उपायुक्त परिमंडळ-1 संदीप सिंह गिल्ल, पोलीस उपायुक्त परिमंडळ-2 स्मार्तना पाटील, पोलीस उपायुक्त परिमंडळ-3 सुहेल शर्मा, पोलीस उपायुक्त परिमंडळ -4 शशिकांत बोराटे, पोलीस उपायुक्त परिमंडळ-5 विक्रांत देशमुख, पोलीस उपायुक्त वाहतूक विभाग विजयकुमार मगर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, वाहतूक शाखा व पोलीस ठाण्याचे अधिकारी, अंमलदार यांच्या पथकाने संयुक्तपणे हे कोम्बिंग ऑपरेशन राबविले आहे. यापुढे देखील ऑपरेशन राबण्यात येणार असून कारवाई करण्यात येणार आहे.












