विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील अट्टल गुन्हेगार ऋतिक गौतम अवधूत (वय १९ वर्षे, रा. संजयपार्क झोपडपट्टी, विमाननगर) याच्या विरोधात स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे. सदर आरोपीने त्याच्या साथीदारांसह विमानतळ पोलीस स्टेशनच्या हद्दीत लोखंडी रॉड, धारदार हत्यार, या सारख्या जीवघेण्या घातक शस्त्राने गंभीर दुखापत करणे, दंगा, बेकायदेशीर हत्यार बाळगणे यासारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे केले आहेत. मागील ५ वर्षामध्ये त्याच्या विरोधात ४ गुन्हे दाखल आहेत.
प्राप्त प्रस्ताव व सह कागदपत्रांची पडताळणी करुन मा.पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री. रितेश कुमार,यांनी नमूद इसमाच्या विरोधात एम. पी. डी. ए. कायद्यान्वये अमरावती मध्यवर्ती कारागृह, अमरावती येथे ०१ वर्षाकरीता स्थानबध्दतेचे आदेश दिले आहेत. सदर आरोपीला स्थानबध्द करण्यामध्ये श्री. विलास सोंडे,वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विमानतळ पोलीस स्टेशन पुणे व श्रीमती वैशाली चांदगुडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पी.सी.बी. गुन्हे शाखा, पुणे शहर यांनी कामगिरी पार पाडली आहे.
मा.पोलीस आयुक्त, पुणे शहर यांनी दहशत निर्माण करणा-या व सक्रिय अट्टल गुन्हेगारांवर कडक प्रतिबंधक कारवाई करण्याचे धोरण अवलंबिले आहे. मा. पोलीस आयुक्त यांनी कार्यभार स्विकारल्यानंतरची एम.पी.डी.ए. कायद्यान्वये स्थानबध्दतेची ही २६ वी कारवाई असून, यापुढेही सराईत व अट्टल गुन्हेगारांचे कृत्यांना आळा घालण्यासाठी प्रभावी प्रतिबंधक कारवाई करण्यात येणार आहे.
पुणे पोलीस आयुक्तांची स्थानबद्धतेची २६वी कारवाई












