घरच्यांनी नातेसंबंधातील प्रेमप्रकरणाला विरोध केल्याने अकोला येथून पळून आलेल्या तरुणाने प्रेयसीचा खून करुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मांजरी येथे उघडकीस आली आहे. ही घटना हडपसर भागातील मांजरी-मुंढवा रोडवरील एका हॉटेलमध्ये १३ मे रोजी मध्यरात्री एक ते १४ मे सकाळी नऊ या वेळे दरम्यान घडली आहे.
मोनिका कैलास खंडारे (वय २४ रा. कसुरा ता. बळापुर, जि. अकोला) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे तर आकाश अरुण खंडारे (वय 30 रा. कसुरा ता. बळापुर जि. अकोला) असे आत्महत्याकेलेल्या तरुणाचे नाव आहे. मोनिका हीच चादरीने गळा आवळून खून करण्यात आला. तिचा खून करून प्रियकर आकाश यानेही सिलिंग फॅनला बेडशीटने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात आकाश खंडारे याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहायक पोलीस निरीक्षक उमेश रोकडे यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोनिका आणि आकाश गावाहून पळून पुण्यात आले होते. ते हडपसर भागातील मांजरी-मुंढवा रोडवरील स्पॉटलाईट हॉटेलमध्ये खोली भाड्याने घेतली होती. आकाशने १३ मे रोजी मध्यरात्री मोनिकाचा ओढणीने गळा आवळून खून केला. त्यानंतर त्याने बेडशीटच्या सहाय्याने खोलीतील सिलिंग फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केली. हडपसर पोलिसांना हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी दोघेजण मृतावस्थेत आढळून आल्याची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी राख, हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे, गुन्हे शाखेचे निरीक्षक उमेश गिते यांनी घटनास्थळी भेट दिली. मोनिका आणि आकाश दोघेही अकोला जिल्ह्यातील बळापूर तालुक्यातील रहिवाशी आहेत. दोघांचे नातेसंबंध असून त्यांचे प्रेमसंबंध होते. मोनिका आणि आकाशच्या प्रेमसंबंधाला कुटुंबाचा तीव्र विरोध होता. आकाश शेती करत होता, तर मोनिका नोकरी करत होती. त्यांच्या प्रेमप्रकरणाला विरोध होत असल्याने त्यांनी यापूर्वीही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता.
पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु करुन दोघांच्या कुटुंबियांची चौकशी केली. चौकशीमध्ये मोनिका आणि आकाश यांच्यात प्रेमसंबंध होते. दोघेही नात्यातील असल्याने त्यांच्या प्रेमसंबंधाला विरोध होता. त्यामुळे दोघेजण पुण्यात पळून आले होते अशी माहिती पोलिसांना प्राप्त झाली. पुढील तपास गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उमेश गिते करीत आहेत.