पुणे : विवाह जुळवणाऱ्या संकेतस्थळावरील माहिती घेऊन फरीदाबाद हरियाना येथील तरुणीशी संपर्क साधला. तिला भारतीय सेनेत मेजर पदावर कार्य़रत असल्याचे सांगून तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून पुण्यात बोलावून घेतले. लग्न करणार असल्याचे सांगून पुण्यातील हॉटेलमध्ये नेऊन तिच्यावर जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर तिच्यासोबत बोलणे बंद करुन तिचा मोबाइल नंबर ब्लॉक करुन फसवणूक केली. तसेच याबाबत तक्रार केली तर कुटुंबाला जीवे मारुन टाकण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी तीन जणांवर लष्कर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत फरीदाबाद हरियाना येथे राहणाऱ्या 30 वर्षीय तरुणीने मंगळवारी (दि.२३) लष्कर पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. यावरून मेजर परीमलकुमार (रा. इगल कज, प्रिन्स ऑफ वेल्स ओरीव रोड, वानवडी), सुरेंद्र (पूर्ण नाव माहित नाही), एक महिला यांच्यावर भा.दं.वि. कलम ३७६/२/न, ५०६, ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार मार्च २०२३ ते ऑगस्ट २०२३ या कालावधीत घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणीने तिच्या लग्नासाठी विवाह जुळवणाऱ्या एका संकेतस्थळावर तिची माहिती अपलोड केली होती. आरोपी महिलेने तरुणीची बसाईट वरील माहिती पाहून तिला फोन करुन चौकशी केली. तसेच मुलगा परीमलकुमार हा भारतीय सेनेत मेजर पदावर कार्यरत असल्याचे सांगितले. आरेपी महिला व सुरेंद्र यांनी पीडित मुलीच्या फरीदाबाद येथील घरी जाऊन ५,१०० रुपये शगुन देऊन लग्नाची बोलणी करुन लग्न जमवले.
तरुणीने आरोपी परीमलकुमार याच्याकडे लग्नाबाबत विचारणा केली असता त्याने मला सुट्टी नसल्याचे सांगून लवकरच तुझ्यासोबत लग्न करणार असल्याचे आश्वासन देवून तरुणीचा विश्वास संपादन केला. त्यानंतर तरुणीला पुण्यात बोलावून घेतले. तरुणी पुण्यात आली असता परिमलकुमार याने घरी नातेवाईक आल्याचे सांगून आपण हॉटेलमध्ये थांबू असे सांगून एमजी रोडवरील एका हॉटेलमध्ये नेले.
परिमलकुमार याने हॉटेलमध्ये शारीरिक संबंधाची मागणी केली. त्यावेळी तरुणीने त्याला नकार दिला असता आपण लवकरच लग्न करणार असल्याचे सांगून आरोपीने तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर तरुणीला खंडाळा येथे फिरायला नेऊन तेथील हॉटेलमध्ये वारंवार लैंगिक अत्याचार केले. परिमलकुमार याने तरुणीसोबत लग्न न करता तिला दिल्ली येथे घेऊन गेला.
दिल्ली येथे आरोपीने लवकरच लग्न करु असे सांगितले. दरम्यान, आरोपींनी अचानक तरुणीसोबत बोलणे बंद करुन तिचा मोबाईल नंबर ब्लॉक केला. तसेच आमची मोठ्या नेत्यांसोबत ओळख आहे. प्रशासनात अधिकाऱ्यांसोबत ओळख आहे, तु आमचे काहीच करु शकत नाही. आमच्या विरोधात तक्रार केली तर तुला व तुझ्या कुटुंबाला जीवे मारुन टाकू अशी धमकी दिली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणीने फरीदाबाद येथील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. फरीदाबाद पोलिसांनी हा गुन्हा लष्कर पोलिसांकडे वर्ग केला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.