पुणे| प्रतिनिधी
पुणे, दि.१४ : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या बैठकीत पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या नगर विकास रचना आणि प्रारूप विकास योजनेच्या आढावा घेतला. प्रारूप विकास योजनेत शहरासाठी आवश्यक सर्व बाबींचा समावेश करावा, असे निर्देश श्री.पवार यांनी यावेळी दिले.
बैठकीला विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, पीएमआरडीए आयुक्त राहुल महिवाल, क्रीडा आयुक्त सुहास दिवसे, पीएमआरडीए अतिरिक्त आयुक्त दीपक सिंघल आदी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री श्री.पवार म्हणाले, आराखड्यात पुरेशा प्रमाणात हरितक्षेत्र आणि पाण्यासाठी लोकसंख्येनुसार आवश्यक नियोजन करण्यात यावे. पीएमआरडीएमध्ये नव्या आकृतीबंधानुसार कर्मचारी भरती करतांना पूर्वी काम केलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा अनुभव लक्षात घेण्याविषयी एमपीएससीला विनंती करण्यात यावी. भौगोलिक रचना लक्षात घेऊन अग्निशमन यंत्रणा उभी करावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.
यावेळी क्रीडा विद्यापीठासाठी जागा निवडीबाबत चर्चा करण्यात आली. क्रीडा विद्यापीठाच्या कामासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल असे श्री.पवार यांनी सांगितले.












