पुणे प्रतिनिधी
पुणे, दि. २२ : जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर चिंचवडजवळ झालेल्या भीषण अपघातात ट्रकने दिलेल्या धडकेत दोघांना आपला जीव गमवावा लागला आहे. ही घटना बुधवारी रात्री साडेदहाच्या सुमारा चिंचवडमधील महामार्गावरील प्रीमियर प्लाझा बिग बाजारजवळ घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, छत्रराम रामजी चौधरी (45) आणि अछलाराम दुर्गाजी चौधरी (50) अशी मृतांची नावे मोपेड दुचाकीवरून महामार्गावरून जात असताना मागून येणाऱ्या ट्रकने त्यांना धडक दिली. या अपघातात दोघांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
याप्रकरणी पोलिसांनी ट्रकचालक रामेवर तुळशीराम जाधव (वय 23, रा. नाशिक) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. भारतीय दंड संहिता (IPC) च्या कलम 304 (अ), 279 आणि 338 नुसार मोटार वाहन कायद्याच्या कलम 184, 119/177 नुसार पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.












