पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. २० : आयात-निर्यातीच्या व्यवसायातून जादा परताव्याचे आमिष दाखवून एका व्यावसायिकाची 91 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार पुणे येथे उघडकीस आला आहे. आरोपी याने सौदी मक्का येथे व्यवसायाचे आमिष फिर्यादीला दाखवले होते.
नादीर अब्दुल हुसैन हसन अली नईमाआबादी (वय 40), सीमा नादीर नईमाआबादी (वय 35, दोघे रा. कॅम्प,पुणे), शोएब मैनुद्दीन अत्तार (वय 35, रा. बोपोडी), माजीद उस्मान अत्तार (वय 50, रा. बोपोडी), खालिद मैनुद्दीन अत्तार (वय 40, रा. बोपोडी) आणि इरम शोएब अत्तार (वय 32, रा. बोपोडी) अशी गुन्हा दाखल झालेल्या नावे आहेत. शेख अब्दुल बासित अब्दुल लतीफ (वय 45 रा. कोंढवा खुर्द) यांनी याबाबत समर्थ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शेख यांचा पादत्राणाचा होलसेल व रिटेल व्यवसाय आहे. शोएब आणि नादीर यांनी फिर्यादीला आयात-निर्यातीच्या व्यवसायात पैसे गुंतवणूक केल्यास चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवले. शेख यांनी विश्वास ठेवून वेळोवेळी 90 लाख 75 हजार रुपये आरोपींच्या बँक खात्यात जमा केले. परंतु परतावा मिळत नसल्याने त्यांनी आरोपींकडे पैशांची मागणी केली.
आरोपींनी बनावट कागदपत्र दाखवून सौदी मक्का येथे व्यवसायाचे आमिष फिर्यादीला दाखवले. तसेच, शोएबने जादूटोण्या सारखे अघोरी कृत्य करुन फिर्यादीला गुंगीकारक पाणी पिण्यास दिले. तसेच, ताविज बनवून देण्यासाठी पैसे घेतले, असेहि फिर्यादीत नमूद केले आहे.
त्यांच्याविरुद्ध फसवणूक आणि महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यात महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधांचे संरक्षण अधिनियम याचा अंतर्भाव करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक (गुन्हे) प्रमोद वाघमारे यांनी दिली.












