रमजान ईदच्या वर्गणीसाठी घरात घुसून दमदाटी केली. तसेच तरुणासोबत वाद घालून शिवीगाळ करुन मारहाण केल्याची घटना घडली आहे. ही घटना मार्केट यार्ड भागातील आंबेडकर नगर परिसरात शनिवारी (दि.३०) रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी मार्केट यार्ड पोलिसांनी दोन सराईत गुन्हेगारांना अटक केली असून परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
याबाबत ४२ वर्षीय महिलेने रविवारी (दि.३१) मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन अरशद इस्माईल बागवान (वय-१९) व आसिफ इस्माईल बागवान (वय-२२ दोघे रा. आंबेडकर नगर, मार्केट यार्ड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी आरोपींवर भा.दं.वि. कलम ३८५, ३२३, ५०४, ५०६, ३४ नुसार गन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, फिर्यादी भाजी आणण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी घरामध्ये त्यांचा मुलगा राहुल व मुलगी होते. रात्री पावणे नऊच्या सुमारास आरोपी व त्याचे इतर दोन मित्र घरी आले. त्यांनी रमजान ईद निमीत्त ५०० रुपये वर्गणी मागितली. यावरुन फिर्य़ादी यांचा मुलगा राहुल व आरोपी यांच्यात वाद झाला. आरोपींनी राहुल याला हाताने मारहाण केली. तसेच वर्गणीसाठी शिवीगाळ करुन दमदाटी केल्याचे फिर्य़ादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
तर अरशद इस्माईल बागवान याने दिलेल्या फिर्यादीवरुन सराईत गुन्हेगार राहुल उर्फ लल्या कांबळे (वय -१९), शुभम कांबळे (वय -२०), डुई ताकतोडे (वय -२१), जग्या (चौघे रा. डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगर, मार्केट यार्ड) यांच्यासह तीन ते चार साथीदारांविरुद्ध भा.दं.वि. कलम ४२७, ५०६, ५०४, १४३, १४४, १४७, १४८, १४९ सह आर्म अॅक्ट, महाराष्ट्र पोलीस कायदा, क्रिमीनल लॉ अमेंन्डमेंट अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
आरोपी हातात कोयते, तलवार घेऊन फिर्यादी यांना मारण्यासाठी त्यांच्या घराजवळ आले.
त्यांनी हातातील तलवार व कोयते उगारले. गल्लीतून जाताना लोकांच्या घराच्या दरवाजावर कोयते मारुन दहशत पसरवली. तसेच वडिलांना कोयता दाखवून शिवीगाळ करुन शेजारी राहणारे शालम शेख यांच्यावर तलवार उगारल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक मदन कांबळे करीत आहेत.