पुणे : पुणे रेल्वे स्थानकाच्या परिसरातून सहा महिन्यांच्या बालकाचे अपहरण करण्यात आले होते. हा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला होता. बंडगार्डन पोलिसांनी सीसीटीव्ही आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे गुन्ह्याचा तपास करुन अपहण झालेल्या बाळाची कर्नाटकातून सुखरुप सुटका केली आहे. तसेच अपहरण करणाऱ्या व बाळाला विकत घेणाऱ्या आरोपींना अटक केली आहे.
श्रावण अजय तेलंग (वय-६ महिने) असे अपहरण झालेल्या बालकाचे नाव आहे. याप्रकरणी चंद्रशेखर मालकाप्पा नलूगंडी (वय २४ रा. जांबगी, ज़िल्हा विजापूर, राज्य कर्नाटक), सुभाष पुत्तप्पा कांबळे (वय ५५ रा. लवंगी, जि. दक्षिण सोलापूर) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत श्रवणचे वडील अजय तेलंग बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना शनिवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात घडली होती.
तेलंग दाम्पत्य मूळचे भुसावळचे आहे. सासूला भेटण्यासाठी तेलंग आणि त्याची पत्नी पुण्यात आले होते. शनिवारी मध्यरात्री पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात तेलंग दाम्पत्य झोपले होते. त्यावेळी अनोळखी व्यक्तीने तेलंग यांचा सात महिन्यांचा मुलगा श्रावण याला उचलून नेले. तेलंग दाम्पत्याला जाग आली. तेव्हा श्रावण जागेवर नसल्याचे आढळून आले. तेलंग दाम्पत्याने त्याचा शोध घेतला. तेव्हा तो सापडला नाही. त्यानंतर घाबरलेल्या तेलंग दाम्पत्याने बंडगार्डन पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली.
घटनेचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीपान पवार मुलाचा शोध घेण्याच्या सुचना तपास पथकाला दिल्या. तपास पथकाने परिसरातील सीसीटीव्ही तपासले. तसेच मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण केले असता आरोपीने बालकाला विजापुर येथे घेऊन गेल्याचे निष्पन्न झाले. आरोपीने बालकाचे अपरहण करुन त्याला चारचाकी कारमधून प्रथम विजापूर जिल्ह्यातील इंडी येथे नेले. त्यानंतर विजापूर येथे घेऊन गेला.
तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांना विजापूर येथे तात्काळ रवाना करण्यात आले.
पथकाने बालकाचा व आरोपीचा शोध घेऊन आरोपी चंद्रशेखर नलूगंडी याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने व त्याचे इतर साथीदारांनी बालकाचे अपहरण केल्याचे सांगितले. तसेच सुभाष पुत्तप्पा कांबळे (वय ५५ रा. लवंगी, जि. दक्षिण सोलापूर) यांना बाळाची विक्री केल्याची माहिती दिली. पोलिसांनी सुभाष कांबळे यांचा शोध घेतला असता तो विजापूर शहरातील एका हॉटेल मध्ये असलेची माहिती प्राप्त झाली. पोलिसांच्या पथकाने हॉटेल मध्ये छापा टाकून आरोपीला ताब्यात घेऊन आपहरण बालकाची सुखरुप सुटका केली आहे. ही कारवाई पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.