पुणे : लग्नाचे आमिष दाखवून तरुणीसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर लग्न करण्यास नकार दिल्याने तरुणीने हाताची नस कापून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार ऑक्टोबर २०२३ ते २२ एप्रिल २०२४ दरम्यान शेवाळवाडी, मांजरी, हडपसर परिसरात घडला आहे.
याबाबत सातारा जिल्ह्यातील २३ वर्षीय तरुणीने हडपसर पोलीस ठाण्यात सोमवारी (दि.२२) फिर्याद दिली आहे. यावरुन दत्तात्रय कैलास कदम (वय-२५ रा. शिवतेजनगर, काळेपडळ, हडपसर, पुणे) याच्यावर भा.दं.वि. कलम ३७६, ३७६/२/एन, ५०६ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीची आणि आरोपीची ओळख ऑक्टोबर २०२३ मध्ये झाले. आरोपीने मुलीसोबत ओळख वाढवून ‘आय लव्ह यू, मला तू खूप आवडतेस’ असा मेसेज करुन लग्न करण्याचे खोटे आश्वासन दिले.
त्यानंतर आरोपीने तरुणीला वेळेवेळी वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. आरोपीने लग्न करण्यास नकार देऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास हडपसर पोलीस करीत आहेत.