लोकसभा निवडणूक आता अगदी उंबरठ्यावर असताना देखील संकटकाळात जात असलेल्या पुणे काँग्रेसमधील अंतर्गत वाद मिटताना दिसत नाही. परिणामी पुणे लोकसभेला कोण उमेदवार असणार? याचा तिढा सुटण्याऐवजी आणखी गुंतत चालला आहे. अशातच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमहापौर आबा बागुल यांनी एक लेटर बॉम्ब टाकून नव्या वादांना तोंड फोडले आहे.
आबा बागुल यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना पत्र लिहून जाहीर सभेतून पुणेकरांचा कौल घेऊनच पुणे लोकसभेचा उमेदवार ठरवण्यात अशी विनंती केली आहे. काँग्रेसमधील अंतर्गत वाद नित्याचेच झाले असताना आता बागुल यांच्या पत्रामुळे काँग्रेसमधील वाद-विवाद आणखीनच वाढले आहे. यामुळे पुढील काळात पुणे काँग्रेसमध्ये उमेदवारीवरून हेवे-दाव्यांचा भडका उडण्याची शक्यता आहे.
गेल्या दोन-तीन महिन्यांपासून लोकसभेच्या उमेदवारीवरून पुणे काँग्रेसमध्ये खल सुरू आहेत. प्रदेश काँग्रेस कडून पुण्यातील इच्छुकांची यादी देखील मागून घेण्यात आली आहे. यामध्ये आजी-माजी आमदार, पदाधिकारी, माजी नगरसेवक आणि काँग्रेस कार्यकर्त्यांचा समावेश असलेली 20 जणांची यादी प्रदेश काँग्रेसला पाठवण्यात आली आहे. दरम्यानच्या काळामध्ये काँग्रेसकडून इच्छुक असणाऱ्या नेत्यांकडून मोर्चेबांधणीला सुरुवात करण्यात आल्याचे पाहायला मिळालं.
मात्र या काळामध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असलेले आबा बागुल मात्र या सर्व प्रक्रियेपासून दूरच असल्याचे पाहायला मिळाले. बहुतांश बैठकींना त्यांनी उपस्थिती देखील लावली नव्हती. आणि आता पुढील काही दिवसात उमेदवारी जाहीर होणार असतानाच आबा बागुल यांनी लेटर बॉम्बचे हत्यार उपसले आहे. या लेटरबॉम्ब मुळे पुणे काँग्रेस मधील चलबिचल वाढून अंतर्गत वाद आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.