पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या समजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने वानवडी येथील रुफ टॉप वेजीटा फाईन डाईन बीबी क्यु हॉटेलमध्ये अवैधरित्या सुरु असलेल्या हुक्का बारवर छापा टाकला. या कारवाईत ५८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तर हॉटेल मालक आणि मॅनेजर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई बुधवारी (दि.७) रात्री दहाच्या सुमारास करण्यात आली.
याबाबत पोलीस शिपाई अमित प्रकाश जमदाडे यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. याप्रकरणी मालक राहुल जैन (रा. वानवडी) व मॅनेजर मयुर अर्जुन दातखिळे (रा. बिबवेवाडी, पुणे) यांच्या विरुद्ध सिगारेट व अन्य तंबाखूजन्य उत्पादने महाराष्ट्र सुधारणा अधिनियम २०१८ चे कलम ४ अ व २१ अ अन्वये व महाराष्ट्र कायदा कलम ६५ इ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सामाजिक सुरक्षा विभागाचे पथक वानवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कायद्याचे उल्लंघन करुन चालणांरे हॉटेल/पब चेक करण्यासाठी पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी वानवडी लुलानगर येथील वेजेटा रूफ टॉप हॉटेल येथे अवैध दारू विक्री तसेच अवैध हुक्का विक्री होत असल्याची माहिती मिळाली. पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी हॉटेल वेजीटा फाइन डाइन हॉटेल येथे जाऊन पाहणी केली असता, याठिकाणी ग्राहकांना अवैध हुक्का उपलब्ध करून दिल्याचे आढळून आले.
पोलिसांनी कारवाई करून १९ हुक्का पॉट ,स्टील प्लेट चिलीम सह हुक्का पाईप त्यावर कोळसा तंबाखूजन्य हुक्का फ्लेवर असे ५१ हजार ६९८ रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच ग्राहकांना विदेशी दारूची विक्री करण्यासाठी दारुचा साठा करुन ठेवल्याचे आढळून आले. पोलसांनी ६,९६५ रूपयांची विदेशी दारू जप्त करुन मालक व मॅनेजर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव यांनी दिली.
गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरक्षक भरत जाधव, सहायक पोलीस निरीक्षक अनिकेत पोटे, सहायक पोलीस निरीक्षक राजेश माळेगावे, पोलीस अंमलदार सागर केकान, अमेय रसाळ, अजय राणे, तुषार भिवरकर, हनमंत कांबळे, अमित जमदाडे यांच्या पथकाने केली आहे.