पुणे : २०११-१२ मध्ये पुण्यातील शास्त्रज्ञांनी सूर्याचे निरीक्षण करण्यासाठी स्वदेशी वेधशाळेचे स्वप्न पाहिले होते. जवळपास दशकभराच्या प्रतिक्षेनंतर ‘आदित्य एल-१’ ही सौर वेधशाळा शनिवारी (२ सप्टेंबर) रोजी पृथ्वीपासून १५ लाख किलोमीटरच्या प्रवासासाठी अवकाशात भरारी घेतली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर अॅस्ट्रॉनॉमी अँड अॅस्ट्रोफिजिक्स (आयुका) मधील शास्त्रज्ञ आणि अभियंते यांनी प्रयत्न आणि अपार संयमानंतर हे स्वप्न साकार होत असल्याची भावना व्यक्त केली. ‘आदित्य एल-१’ ची संकल्पना आणि त्यातील एक उपकरण आयुकाने विकसित केले आहे.
शनिवारी श्रीहरिकोटा येथील भारतीय अंतराळ संशोधन संस्था सतीश धवन अंतराळ केंद्रातून आदित्य एल-१ चे प्रक्षेपण करण्यात आले.
“आयुका” प्राध्यापक ए.एन. रामप्रकाश आणि दुर्गेश त्रिपाठी यांनी इस्रोच्या सहकार्याने सोलर अल्ट्राव्हायोलेट इमेजिंग टेलिस्कोप विकसित केले आहे. आयुका मध्येच याची संकल्पना विकसित झाली. सुरुवातीला पृथ्वीभोवती फिरणारी सौर वेधशाळा असावी अशी कल्पना होती. पण नंतर ‘इस्रो’च्या मदतीने आजच्या वेधशाळेची संकल्पना पुढे आली. कोरोनाच्या काळातही आमचे शास्त्रज्ञ काम करत राहिले आणि त्यांनी ‘आदित्य एल-१’ ची महत्त्वाची उपकरणे विकसित केली. यामध्ये देशभरातील अनेक विद्यापीठे आणि संशोधन संस्थांनी सहभाग घेतला आहे.
भारताची महत्त्वाकांक्षी सौर मोहीम 2 सप्टेंबर रोजी ‘पीएसएलव्ही’ या प्रक्षेपण पॅडद्वारे सकाळी 11:50 वाजता ‘आदित्य एल-1’ हे अंतराळयान सूर्याच्या अभ्यासासाठी अवकाशात सोडण्यात आले. भारताच्या यशस्वी चांद्रयान-3 मोहिमेनंतर अवघ्या दहा दिवसांनी दुसरी मोठी अंतराळ मोहीम सुरू झाली आहे. सूर्याच्या प्रभामंडळाचा अभ्यास करणे आणि तेथून एल-१ पर्यंत पोहोचून सौर वाऱ्याचा अभ्यास करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे.












