शिक्रापूर परिसरातील जातेगावमध्ये ७६ वर्षीय वृद्ध महिलेचा खून करून दरोडा टाकणाऱ्या दोन अट्टल गुन्हेगारांना पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखा व शिक्रापुर पोलीस ठाण्यातील तपास पथकाने अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून पाच गुन्हे उघडकीस आले आहेत.
याप्रकरणी टोळीप्रमुख अविनाश उर्फ लंगड्या उर्फ गिल्या रमेश काळे (वय २८, रा. कोळगाव मोहरवाडी, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर), प्रवीण दीपक भोसले (वय 21 रा. जातेगाव फाटा, ता. शिरुर, जि. पुणे) यांना अटक करण्यात आली. याप्रकरणी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे. अविनाश काळे याच्याविरुद्ध दरोडा, घरफोडी असे गंभीर स्वरुपाचे १५ गुन्हे दाखल आहेत.
दि.२४ एप्रिल रोजी शिक्रापूर परिसरातील जातेगाव बुद्रुक परिसरात मध्यरात्री काळे, भोसले आणि अल्पवयीन साथीदारांना एका घरात दरोडा टाकला होता. आरोपींनी कृष्णाबाई ज्ञानेश्वर इंगवले (वय ७६) यांना बेदम मारहाण करून त्यांच्याकडील दागिने लुटले होते. मारहाणीत त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला होता. याप्रकरणी शिक्रापुर पोलीस ठाण्यात भा.दं.वि. कलम ३०२, ३९७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिक्रापूर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय अधिकारी प्रशांत ढोले यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाबाबत सूचना दिल्या होत्या. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या नेतृत्वाखाली दोन तर शिक्रापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक रत्नदीप गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली एक अशी तीन पथके तयार करण्यात आली. आरोपींचा शोध घेत असताना एलसीबीच्या पथकाला आरोपी काळे, भोसले आणि साथीदाराने दरोडा टाकल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने प्रविण भोसले व अल्पवयीन आरोपीला सांगली येथून ताब्यात घेतले. त्यांच्याकडे केलेल्या तपासादरम्यान मिळालेल्या माहितीवरुन अविनाश काळे याला कोळगाव येथून एलसीबी व शिक्रापूर पोलिसांच्या पथकाने ताब्यात घेतले.
आरोपी अविनाश काळे हा सराईत गुन्हेगार असून तो 15 गुन्ह्यात फरार होता. त्याच्याकडून शिक्रापूर, आळेफाटा पोलीस ठाण्यात दाखल असलेले दरोडा, घरफोडी चोरीचे पाच गुन्हे उघडकीस आले आहेत
ही कारवाई पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, शिक्रापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक रत्नदीप गायकवाड, एलसीबीचे सहायक पोलीस निरीक्षक राहुल गावडे, कुलदीप संकपाळ, योगेश लंगुटे, अमित सिदपाटील, शिक्रापुर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक केशव वाबळे, सतिश पवार, पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे, पोलीस अंमलदार बाळासाहेब कारंडे, तुषार पंदारे, जनार्दन शेळके, राजु मोमीण, अतुल डेरे, मंगेश थिगळे, स्वप्निल अहीवळे, अभिजीत एकशिंगे, संजू जाधव, योगेश नागरगोजे, दिपक साबळे, विक्रम तापकीर, विजय कांचन, आसिफ शेख, राहुल घुबे, धिरज जाधव, अक्षय नवले, सागर धुमाळ, संदिप वारे, निलेश सुपेकर, अक्षय सुपे, काशिनाथ राजापुरे, अमोल दांगडे, शिवाजी चितारे, रोहीदास पाखरे, विकास पाटील, निखील रावडे यांच्या पथकाने केली.