पुणे, दि.२९: सोमवार पासून पुणे शहराची पाणी कपात बंद होणार असून ही पुणेकरांसाठी खास पर्वणी ठरणार आहे. खडकवासला प्रकल्प क्षेत्रात पुरेसा पाऊस झाल्याने आणि प्रकल्पात समाधानकारक पाणीसाठा झाल्याने पुणे शहरासाठी प्रत्येक आठवड्यात करण्यात येणारी पाणी कपात येत्या सोमवारपासून रद्द करण्यात येणार आहे.
खडकवासला प्रकल्पातील पाणीसाठा २१.६२ टीएमसी असून गतवर्षी याच कालावधीत हा साठा २१.४२ टीएमसी होता. वर्षभरात पिण्याचे पाणी व शेतीसाठी साधारण ३० टीएमसी पाण्याची आवश्यकता असते.
शेतीसाठी लागणारे पाणीही देण्यात यावे आणि धरणाच्या पाण्यावर अवलंबून असलेले तलावही भरण्यात यावेत. येत्या काळात पावसाचे प्रमाण लक्षात घेऊन पुढील आढावा घेण्यात यावा असे निर्देश पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी दिले.
हा निर्णय आढावा बैठकीत घेण्यात आला असून शासकीय विश्रामगृह येथे आयोजित आढावा बैठकीस महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता प्रसन्न जोशी, कार्यकारी अभियंता श्वेता कुऱ्हाडे, महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर आदी उपस्थित होते.












