पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. ०९ : कर्वेनगर येथील महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या आवारातील चंदनाचे झाड कापून चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना वारजे माळवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली असून आशिष पवार नामक इसमाने एका अज्ञात व्यक्तीविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे.
फिर्यादी हे सुरक्षा अधिकारी म्हणून काम पाहत आहेत. दि. ०७ रोजी कोणीतरी अज्ञात इसमाने महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या आवारातील तब्बल तीस हजार रुपये किमतीचे चंदनाचे झाड कशाच्या तरी सहाय्याने कापून चोरून नेले आहे.
आरोपीवर भादवि कलम ३७९ अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून अद्याप आरोपीला अटक करण्यात आलेले नाही. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जवळगी हे करत आहेत.












