पुणे : कल्याणीनगर अपघात प्रकरणावरून विविध संघटना, पक्ष शहरात आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. काल उत्पादन शुल्क विभागात जात आमदार रवींद्र धंगेकर आणि सुषमा अंधारे यांनी ४८ तासांचा अल्टीमेटम देत अनधिकृत पब, बार यावर कारवाई करण्याची मागणी केली. अन्यथा उग्र आंदोलन करण्याचा इशारा दिला.
विशाल अगरवाल यांना कोर्टात आणले असता संघटनेकडून त्यांच्यावर शाई फेकण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकारही घडला होता. कल्याणीनगर अपघात प्रकरणात नवनवीन ट्विस्ट समोर येत आहेत. त्यानुसार पक्ष, संघटना आक्रमक झाल्याचेही दिसत आहे. पुणे शहरात नागरिकांच्या विविध प्रश्नांना घेऊन पक्ष, संघटना यांच्याकडून आंदोलने, उपोषण, निदर्शने सुरु असल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून आता मनाई आदेश लागू करण्यात आला आहे. हा आदेश विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी दिले आहेत.
पुणे शहर परिसरात सार्वजनिक शांतता आणि सार्वजनिक सुरक्षितता राखण्यासाठी महाराष्ट्र पोलिस अधिनियम सन-१९५१ च्या कलम ३७ (१) (२) (३) अन्वये मनाई आदेश लागू करण्यात आला आहे. हा आदेश २८ मे २०२४ ते १० जून २०२४ पर्यंत लागू आहे. याअंतर्गत कोणताही दाहक पदार्थ अथवा स्फोटक पदार्थ, ज्वलनशील द्रव पदार्थ बरोवर नेणे, दगड अथवा शस्त्रे किंवा अस्त्रे, सोडावयाची अस्त्रे किवा फेकावयाची हत्यारे अगर साधने बरोबर नेणे, जमा करणे व तयार करणे, शस्त्रे, सोटे, भाले, तलवारी, दंड, काठ्या, बंदुका व शारीरिक इजा करण्यासाठी वापरात येईल अशी कोणतीही वस्तू बरोबर नेण्यास मनाई करण्यात आली आहे.