पुणे : भारतीय जनता पक्षाचा संविधान बदलण्याचा अजेंडा सगळ्यांसमोर आलेला आहे. यंदाच्या निवडणुकीत बहुमत मिळाल्यानंतर संविधान बदलणे हा त्यांचा प्राधान्यक्रम राहणार आहे , त्यामुळे सर्वांना समान संधी उपलब्ध करून देणाऱ्या भारतीय संविधानाला वाचवण्यासाठी काँग्रेस पक्षाला निवडून देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन पुणे शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी केले.
काँग्रेस भवन येथे आंबेडकरी चळवळीत काम करत असलेल्या विविध पक्ष संघटनांच्या प्रतिनीधींच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यामध्ये रिपब्लिकन युवा मोर्चाचे राहुल डंबाळे, सुवर्णा डंबाळे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे अशोक जगताप, रिपब्लिकन जनशक्तीचे शैलेंद्र मोरे, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे जीवन घोंगडे, रिपब्लिकन चे आनंद कांबळे, माजी नगरसेवक अजित दरेकर यांचे सह काँग्रेस अनुसूचित जातीचे शहराध्यक्ष सुजित यादव उपस्थित होते. आंबेडकरी जनता कायम वैचारिक भूमिका घेत आलेली असून यंदाच्या वर्षी संविधानाला असलेला धोका स्पष्टपणे जाणवत आहे त्यामुळे कोणतेही भावनिक व सामाजिक दडपण न स्वीकारता आंबेडकरी चळवळीतील बहुतांश कार्यकर्ते हे भाजपच्या पराभवासाठी काँग्रेस पक्षासमवेत तसेच देशपातळीवर इंडिया आलाय समवेत काम करत आहेत अशी भूमिका उपस्थित सर्वच मान्यवरांनी व्यक्त केली.
१०० वस्ती मधून संविधान रथ फिरणार
दरम्यान पुणे लोकसभा मतदारसंघातून दलित , मागासवर्गीय तसेच आंबेडकरी समुदायाची जास्तीत जास्त मते रवींद्र धंगेकर यांना मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार असून यासाठी सुमारे १०० वस्ती मधून संविधान रथ फिरवण्यात येणार आहे असे देखील यावेळी ठरवण्यात आले आहे.
दरम्यान राहुल गांधी यांच्या तीन तारखेच्या सभेमध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन सभा यशस्वी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे रिपब्लिकन युवा मोर्चाचे राहुल डंबाळे यांनी सांगितले.